Sawantwadi News : वेत्ये येथे हायवे शेजारील उघड्या शेडमधून मोटारसायकल लांबवली

शेअर करा

अज्ञात चोरट्याविरुद्ध सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल

​सावंतवाडी,दि.२८ ऑक्टोंबर
मुंबई-गोवा महामार्गालगत वेत्ये (ता. सावंतवाडी) येथील एका उघड्या शेडमध्ये उभी करून ठेवलेली हिरो कंपनीची एचएफ डीलक्स मोटारसायकल अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
​मिळालेल्या माहितीनुसार, मनेराजुरी (ता. तासगाव, जि. सांगली) मूळ रहिवासी असलेले व सध्या निरवडे (माळगाव रेल्वे स्टेशनजवळ) येथे राहणारे व्यावसायिक कॉन्ट्रॅक्टर विजय विलास लांडगे (वय २८) यांनी आपली लाल-काळ्या रंगाची हिरो एचएफ डीलक्स मोटारसायकल (क्रमांक MH 10 DE 6866) वेत्ये येथील जितेंद्र गावकर यांच्या हायवे शेजारील उघड्या शेडमध्ये पार्क केली होती.
​दिनांक २५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ९:०० ते सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्याने सदर मोटारसायकल चोरून नेली. याप्रकरणी फिर्यादी विजय लांडगे यांनी दिलेल्या तक्रारीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंद (क्र. २९०/२०२६) करण्यात आला आहे.
​घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील व पोलीस हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. महिला पोलीस अंमलदार कदम यांनी तक्रार दाखल करून घेतली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार धोत्रे करत आहेत.

शेअर करा