दोन टीव्हीएस ज्युपिटर गाड्यांसह १ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त; संशयिताविरोधात गुन्हा दाखल!
सावंतवाडी,दि.२८ ऑक्टोंबर
शहरात बेकायदेशीरपणे गोवा बनावटीची दारू बाळगून ती विक्रीसाठी फिरणाऱ्या एका संशयितावर सावंतवाडी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. पोलिसांनी दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपीटर गाड्यांसह तब्बल १ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री ९ वाजून २० मिनिटांच्या सुमारास सावंतवाडी शहरात ही कारवाई करण्यात आली. संशयित आरोपी श्रीकांत आजगावकर हा आपल्या ताब्यातील दोन वेगवेगळ्या टीव्हीएस ज्युपीटर गाड्यांच्या (क्र. MH-07-AV-9515 व क्र. MH-07-AW-1201) डिकीमध्ये विनापरवाना व बेकायदेशीरपणे गोवा बनावटीच्या विविध ब्रँडच्या दारूच्या सिलबंद बाटल्या विक्री करत असताना रंगेहात निदर्शनास आला. या कारवाईदरम्यान दोन्ही ज्युपीटर गाड्या आणि त्यांच्या डिकीमध्ये आढळून आलेल्या विविध कंपन्यांच्या गोवा बनावटीच्या दारूच्या सिलबंद बाटल्या असा एकूण १ लाख ६५ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. हिंगे, पीएसआय अविनाश पाटील, हेड कॉन्स्टेबल श्री. शिंदे, अमित राऊळ, श्री. भुजबळ आणि तपास अधिकारी श्री. शिंगाडे व इतर अंमलदारांच्या पथकाने केली आहे. आरोपीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला नोटीस बजावण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शिंगाडे करत आहेत.