सावंतवाडी:
पारंपारिक जीवनपद्धतीचा त्याग करून माणसाने स्वीकारलेल्या आधुनिकीकरणामुळे आज मानवी जीवनात समस्यांच्या ढगांची गर्दी झाली असून महागाईचा भस्मासुर दिवसेंदिवस अधिक तीव्र होत चालला आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आणि जागतिक घडामोडींमुळे आज सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरीब जनता महागाईच्या खाईत होरपळून निघत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे.
एकेकाळी मानवाचा प्रवास हा बैलगाडी, सायकल किंवा पायी निसर्गाच्या सानिध्यात होत होता. मात्र, आधुनिकतेच्या नावाखाली कार आणि मोटरसायकलचा वापर कमालीचा वाढला आहे. पूर्वी चुलीवर स्वयंपाक करून सात्विक जेवण घेणारा माणूस आता पूर्णपणे गॅस सिलिंडरवर अवलंबून राहू लागला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मानवाने आपली हक्काची शेती सोडून शहरांकडे आणि आधुनिकीकरणाकडे धाव घेतल्यामुळे त्याचे स्वावलंबित्व संपून तो इतरांवर अवलंबून राहू लागला आहे. या परावलंबित्वामुळेच आज सर्व समस्या निर्माण झाल्या आहेत.
सध्या जागतिक पातळीवर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या अंतर्गत वाद आणि भांडणामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ विस्कळीत झाली आहे. याचा थेट फटका भारतातील जनतेला बसत असून देशात पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दर गगनाला भिडले आहेत. सद्यस्थितीत गॅस आणि पेट्रोल-डिझेल महागले तर आहेच, शिवाय ते मिळवण्यासाठी नागरिकांना पेट्रोल पंपांवर आणि गॅस एजन्सीबाहेर तासनतास रांगा लावाव्या लागत आहेत. या वाढत्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पंतप्रधानांनीही जनतेला काटकसर करण्याचे आवाहन केले आहे.
एकंदरीत, या सर्व परिस्थितीचे ऐकून, पाहून आणि विचारमंथन केले असता, माणसाने विज्ञानाच्या जोरावर प्रगती केली असली, तरी त्याचा हा प्रवास आता शून्यातून पुन्हा शून्याकडेच सुरू झाला आहे की काय, अशी भीती जाणकार आणि नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. या वाढत्या महागाईमुळे देशातील गोरगरीब जनता पूर्णपणे भरडली जात असून, वेळीच योग्य पावले न उचलल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.