सावंतवाडी,दि.२१ जून
महाराष्ट्र शासनाच्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना, तसेच विधवा, अंध, अपंग, मूकबधिर, कर्णबधिर आणि १८ वर्षांखालील अनाथ मुले यांच्यासाठीच्या विविध अर्थसाह्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. या सर्व लाभार्थ्यांना आता १५ जूनच्या नवीन शासन निर्णयानुसार ‘हयात दाखला’ (Life Certificate) ऑनलाइन पद्धतीने देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी शासनातर्फे ‘BSA’ (Beneficiary Satyapan App – बेनिफिशियरी सत्यापन अॅप) सुरू करण्यात आले असून, ३० जून ही यासाठी अंतिम तारीख आहे, अशी माहिती जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी दिली आहे.
ज्या लाभार्थ्यांनी १ एप्रिलपासून तलाठ्याँमार्फत ऑफलाइन पद्धतीने हयात दाखला जमा केला आहे, त्यांनाही आता नवीन शासन निर्णयानुसार पुन्हा ऑनलाइन पद्धतीनेच दाखला सादर करावा लागणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी सेतू केंद्र, महा-ई-सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयात जाऊन कोतवालांमार्फत हा दाखला ऑनलाइन करून घेणे आवश्यक आहे. यासाठी शासनाने ५० रुपये दर निश्चित केला आहे. ३० जून अखेरपर्यंत हा दाखला ऑनलाइन न केल्यास पुढील महिन्यांपासूनचे अर्थसाह्य बँक किंवा पोस्ट खात्यात जमा होणार नाही, असा इशारा मसुरकर यांनी दिली आहे.
वयोवृद्ध आणि दिव्यांगांना घरपोच सुविधा
जे लाभार्थी अत्यंत वयोवृद्ध आहेत, अंथरुणाला खिळलेले (बेडवर) आहेत या गंभीर दिव्यांग (अंध, अपंग, मूकबधिर) आहेत, अशा व्यक्तींच्या घरी जाऊन तलाठी कार्यालयामार्फत किंवा कोतवालांमार्फत ऑनलाइन हयात दाखला घेण्याची विशेष सुविधा शासनाने उपलब्ध करून दिली आहे.
ऑनलाइन हयात दाखल्यासाठी लाभार्थ्याला स्वतः सेतू किंवा महा-ई-सेवा केंद्रावर जावे लागेल. कारण तेथे कॉम्प्युटर किंवा मोबाईलद्वारे लाभार्थ्यांचे ‘फेस रीडिंग’ (चेहरा पडताळणी) केले जाणार आहे. केंद्रावर जाताना कागदपत्रे सोबत ठेवणे आवश्यक आहे. त्यात आधार कार्ड,चालू मोबाईल नंबर,बँक किंवा पोस्टाचे पासबुक,
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी शासनाने दिलेले कार्ड (क्यूआर कोडसह) समावेश आहे.
दरवर्षी १ एप्रिल ते ३० जून या कालावधीत हयात दाखला देणे बंधनकारक आहे. यासोबतच, दर पाच वर्षांनी तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी योजना विभागात उत्पन्नाचा दाखला सादर करणे आवश्यक आहे. जर लाभार्थ्यांनी वेळेत हयात दाखला ऑनलाइन दिला नाही, तर त्यांचे मानधन तात्काळ बंद होऊ शकते.
या महत्त्वपूर्ण कामासाठी सर्व सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील गरजू, वृद्ध व अडाणी लाभार्थ्यांना माहिती देऊन ऑनलाइन दाखला काढून देण्यासाठी ‘ईश्वरी सेवा’ म्हणून सहकार्य करावे, असे आवाहनही जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.