सावंतवाडी, दि. २९ जून
“ज्याप्रमाणे कोरोनाच्या काळात जागोजागी आजार पसरून मृत्यू होत होते, तशाच पद्धतीने सध्या देशात आणि राज्यात पेपरफुटीची खारफुटी झपाट्याने पसरत चालली आहे,” अशी घणाघाती टीका सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. नीट (NEET) आणि सीबीएसई (CBSE) परीक्षांच्या पेपरफुटीचे प्रकरण देशभरात गाजत असतानाच, महाराष्ट्रात ‘टीईटी’ (TET) परीक्षेचा पेपर फुटल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या ‘टीईटी’ परीक्षेसाठी एकूण ६ लाख शिक्षक परीक्षार्थी बसले होते. यामध्ये राज्यभरातील सव्वादोन लाख शिक्षकांचा समावेश होता. तीव्र उन्हाळा, जनगणना आणि ‘एसआयआर’ (SIR) यांसारखी शिक्षणेतर कामे आटोपून, अत्यंत कठीण परिस्थितीत अभ्यास करून हे शिक्षक परीक्षेला बसले होते. मात्र, महाराष्ट्रातील भिवंडी येथे हा पेपर फुटला असून या गैरव्यवहाराची सूत्रे बिहारपर्यंत पोहोचल्याचे समोर आले आहे.
या गंभीर परिस्थितीवर उपरोधिक टीका करताना डॉ. परुळेकर म्हणाले की, “२०४७ मध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सरकारने अवलंबिलेले हे एखादे नवे नाविन्यपूर्ण धोरण असावे असेच आता दिसू लागले आहे.” नीटची फेरपरीक्षा घेण्यासाठी थेट वायुसेनेच्या विमानांची मदत घेण्याची नामुष्की केंद्र सरकारवर आली होती. एवढे होऊनही पेपरफुटीची लागण थांबलेली नाही, ती सातत्याने पसरतच आहे.
”केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी देशभरातून होत असताना, आता महाराष्ट्रातील या पेपरफुटीनंतर जनतेने राज्यच्या शिक्षणमंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी करायची का?” असा संतप्त सवाल डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी शेवटी उपस्थित केला आहे.