सावंतवाडी : पोलिसांनी बेकायदेशीरपणे केलेली अटक ठरली अयोग्य; सायबर गुन्ह्यातून पश्चिम बंगालमधील आरोपीची न्यायालयाकडून मुक्तता

शेअर करा

सावंतवाडी दि.२ ऑक्टोबर
सिंधुदु्र्गनगरी पोलीस ठाण्यातील सायबर गुन्ह्यातील आरोपी अश्वी बिनोदकुमार जयस्वाल हिची पोलिसांनी केलेली अटक सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करणारी आणि बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत, सिंधुदु्र्गनगरी येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी स्वाती पाटील यांनी तिची या गुन्ह्यातून तात्काळ मुक्तता केली आहे. आरोपीतर्फे ॲड. बाळाजी रणशूर व ॲड. वामन निर्गुण यांनी काम पाहिले.
​नक्की प्रकरण काय?
NCCRP आणि समन्वय पोर्टलवर मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदु्र्गनगरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बँकेमधील खात्यात १५ ऑक्टोबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान अनेक संशयास्पद पैशांचे व्यवहार झाल्याचे उघडकीस आले होते. संबंधित बँक खाते हनुमंत सावंत (रा. ओरोस खुर्द, ता. कुडाळ) यांच्या नावे असून त्या खात्यावर देशभरातून सायबर फसवणुकीच्या तब्बल १६ तक्रारी नोंदवल्या गेल्या होत्या. सुमारे ३ लाख १५ हजार ०९९ रुपयांची फसवणूक या खात्याद्वारे झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता.
​याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ. अमोल विठ्ठल आखरे यांनी फिर्याद दिल्यानंतर ३० जुलै २०२६ रोजी गुन्हा नोंदवण्यात आला. यानंतर पोलिसांनी २ ऑगस्ट २०२६ रोजी हनुमंत सावंत याला अटक केली. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून अरुण उर्फ शिवा परब, संजीव कुमार दिलीप सिंह यांना अटक करण्यात आली. पुढे तपासादरम्यान पश्चिम बंगाल (हावडा/कोलकता) येथील आरोपी अश्वी बिनोदकुमार जयस्वाल आणि बिराज बाप्पा सिंग यांना पोलिसांनी अटक केली.
​न्यायालयासमोर युक्तिवाद आणि बेकायदेशीर अटक:
२२ सप्टेंबर २०२६ रोजी आरोपी अश्वी जयस्वाल हिला न्यायालयात हजर करून २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. दरम्यान, डेंग्यूमुळे प्रकृती बिघडल्याने तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. १ ऑक्टोबर २०२६ रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा कोठडीची मागणी करत तिला न्यायालयात हजर केले.
​यावेळी आरोपीच्या वकिलांनी ‘मिहीर शहा वि. महाराष्ट्र सरकार’ या सर्वोच्च न्यायालयाच्या महत्त्वपूर्ण निकालाचा दाखला देत पोलिसांची अटक प्रक्रिया पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
​आरोपीला मराठी भाषा येत नसतानाही अटकाची कारणे केवळ मराठीत दाखवली व दिली गेली. तिला समजेल अशा भाषेत कारणे देणे बंधनकारक होते.
न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्याच्या किमान दोन तास आधी अटकाची कारणे देणे गरजेचे असताना, आरोपीस सायंकाळी ४.४५ वाजता अटक दाखवून अवघ्या ५.५० वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.
अटकाची माहिती आरोपीच्या नातेवाईकांना देण्यात आली नव्हती.
​ॲड. रणशूर यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत मे. न्यायालयाने आरोपी अश्वी जयस्वाल हिची अटक बेकायदेशीर ठरवली आणि तिची या गुन्ह्यातून तात्काळ मुक्तता करण्याचे आदेश दिले.

शेअर करा