सावंतवाडी व्यापारी संकुल गाळेधारकांच्या प्रश्नांवर अखेर सकारात्मक तोडगा

शेअर करा

सुधारित भाडे, नापरतावा प्रिमिअम, थकीत देयके व भाडेपट्टा निष्पादनाबाबत संयुक्त बैठकीत महत्त्वाचे निर्णय; सर्वपक्षीय नगरसेवक व गाळेधारक प्रतिनिधी उपस्थित

सावंतवाडी,दि.१६ जुलै
सावंतवाडी नगरपरिषदेच्या स्व. इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील गाळे व खुले ओटे यांचे सुधारित मासिक भाडे, नापरतावा प्रिमिअम , थकीत देयके आणि भाडेपट्टा निष्पादनाबाबत अखेर सकारात्मक तोडगा निघाला आहे. या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आज, गुरुवारी नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नगराध्यक्षा सौ श्रध्दा सावंत भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत सर्वपक्षीय नगरसेवक आणि संकुलातील गाळेधारक व ओटेधारक यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे आणि चर्चा


​सुधारित भाडे व प्रिमिअमची माहिती: बैठकीदरम्यान प्रशासनातर्फे गाळे व ओट्यांच्या सुधारित मासिक भाड्याबाबत आणि नापरतावा प्रिमिअमबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी व्यापाऱ्यांच्या शंका व प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली, तसेच थकीत भाडे आणि प्रीमियमची रक्कम तात्काळ जमा करण्याच्या सूचना केल्या.
​ नगराध्यक्षा सौ श्रध्दाराजे भोसले यांनी या संपूर्ण प्रकरणावर सकारात्मक भूमिका घेत व्यापाऱ्यांना प्रशासनाकडून पूर्ण सहकार्य मिळेल, अशी ग्वाही दिली.


​व्यापाऱ्यांकडून नगराध्यक्ष व प्रशासनाचे आभार:
​प्रशासनाने घेतलेल्या या दिलासादायक आणि लवचिक भूमिकेनंतर उपस्थित सर्व व्यापाऱ्यांनी नगराध्यक्ष व सर्वपक्षीय नगरसेवकांचे विशेष आभार मानले.
​”नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा प्रलंबित प्रश्न अत्यंत चांगल्या पद्धतीने मार्गी लावला आहे,” अशा भावना व्यापाऱ्यांनी या वेळी व्यक्त केल्या.


​भाडे कमी झाल्यामुळे व्यापारी वर्गात आता समाधानाचे वातावरण असून, सर्व व्यापाऱ्यांनी नगरपरिषदेचे थकीत व नियमित भाडे वेळेवर भरण्याची पूर्ण तयारी दर्शवली आहे. या निर्णयामुळे नगरपरिषदेच्या उत्पन्नात नियमितता येईल आणि व्यापारी-प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक दृढ होईल, असा विश्वास या बैठकीदरम्यान व्यक्त करण्यात आला.
​बैठकीच्या शेवटी गाळेधारकांचे प्रतिनिधी पुंडलिक दळवी यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले आणि बैठकीची सांगता झाली. या बैठकीला शहरातील प्रमुख व्यापारी, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नगरपरिषदेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर,नियोजन सभापती आनंद नेवगी, आरोग्य सभापती सुधीर आरिवडेकर, , महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर,पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, उद्यान आणि पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सुकन्या टोपले, नीलम नाईक, दुलारी रांगणेकर, सुनिता पेडणेकर, अजय गोंदवले, सायली दुभाषी, स्नेहा नाईक,देवेंद्र टेमकर, सिद्धार्थ भांबुरे आदी नगरसेवक उपस्थित होते

शेअर करा