सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण फ्लायओव्हरवर भगदाडे; कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह

शेअर करा

झाराप व इन्सुली-खामदेव नाका येथील पुलांवरील भगदाडे लपवण्यासाठी प्लास्टरिंग सुरू असल्याचा आरोप; कामाचे स्वतंत्र ऑडिट करण्याची सामाजिक कार्यकर्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणी

सावंतवाडी,दि.२३ जुलै
मुंबई गोवा महामार्गावर झाराप आणि इन्सुली खामदेव नाका येथील फ्लायओव्हर ब्रिज अजून सुरूही झालेले नाहीत आणि त्यांना भगदाडं पडलेली आहेत.
ती भगदाडं दिसू नयेत म्हणून लपवली जात आहेत आणि घाईघाईने त्यावर प्लास्टरिंग केलं जात आहे,या कामाचं ऑडिट झाले पाहिजे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे.

मुळात या महामार्गावर अजूनही वाहतूक तुरळक आहे.ट्रॅफिक अजिबात नाही आणि ट्रॅफिक जामचा तर प्रश्नच नाही.
असे असताना हे फ्लायओव्हर ब्रिज बांधण्यात आले ते कोणाचे हात ओले करण्यासाठी बांधण्यात आले ते अनाकलनीय आहे.
हा ४० टक्क्यांचा खेळ जनतेच्या पैशावर चालला आहे काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून बांधण्यात आलेले हे ब्रिज नजिकच्या भविष्यकाळात जर पडले आणि वरून जाणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात झाला तर कोण जबाबदार असणार आहे? याबाबत बांधकाम विभागाने जाहीर केले पाहिजे असे मत डॉ जयेंद्र परुळेकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.

सदर ब्रिजेस् च्या बांधकामाचे ऑडिट होणं गरजेचं आहे.
जनतेचे जीव घेणारे हे धोकादायक ब्रिज वाहतूकीसाठी सुरक्षित आहेत याची हमी सामान्य जनतेला मिळाली पाहिजे, यासाठी सखोल चौकशी करून ऑडिट करण्याची मागणी डॉ परूळेकर यांनी केली आहे.

शेअर करा