सावंतवाडीकरांची जाहीर दिलगिरी; अर्धवट कामांवर संजू परब आक्रमक

शेअर करा

पावसाळ्यात नागरिकांची गैरसोय मान्य; निकृष्ट व अपूर्ण कामांवर ठेकेदार आणि प्रशासनाला धारेवर

​सावंतवाडी,दि.२६ जून
पावसाळा सुरू झाला तरी शहरातील गटारी, रस्ते आणि इतर पायाभूत सुविधांची कामे अर्धवट असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या पार्श्वभूमीवर, “महायुतीचा नगरसेवक म्हणून मी सावंतवाडीतील जनतेची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो,” असे शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी सांगितले. तसेच, संवेदनशील पावसाळी दिवस असल्याने आणि पक्षाची जबाबदारी असल्याने आपण स्वतः प्रशासकीय काश्मीर दौऱ्यावर न जाता सावंतवाडीतच थांबण्याचा निर्णय घेतला, असेही त्यांनी स्पष्ट केले.
​संजू परब म्हणाले की, पावसाळ्यात स्थानिक जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास किंवा गैरसोय होऊ नये, याची काळजी घेणे लोकप्रतिनिधी म्हणून आपले कर्तव्य आहे. सध्या शहरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून अर्धवट ठेवण्यात आले आहेत, तर काही ठिकाणी निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. अर्धवट कामे करणाऱ्या संबंधित ठेकेदारांना प्रशासनाने नोटिसा बजावल्या आहेत. शहरातील गटार साफसफाईची कामे आता सुरू झाली असून, नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याच्या निकृष्ट कामाचा पर्दाफाश केला आहे.
​दरम्यान, सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या काश्मीर दौऱ्यावर होत असलेल्या टीकेला उत्तर देताना संजू परब यांनी सांगितले की, हा दौरा पूर्णपणे प्रशासकीय आहे. त्यामुळे नगरसेवक केवळ फिरायला गेले आहेत, असे म्हणणे अत्यंत चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहे. मात्र, शहरात निर्माण झालेली परिस्थिती पाहता प्रशासनाने आणि ठेकेदारांनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.

शेअर करा