सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनसचे नाव ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याची प्रक्रिया सुरू; केंद्र सरकारकडून विविध मंत्रालयांचे अभिप्राय मागवले

शेअर करा

सावंतवाडी,दि.३१ जुलै
कोकण रेल्वे मार्गावरील ‘सावंतवाडी रेल्वे स्टेशन टर्मिनस’ चे नामकरण नामांकित संसदपटू आणि माजी केंद्रीय मंत्री कै. मधू दंडवते यांच्या सन्मानार्थ ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ असे करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तावानंतर आता केंद्र सरकारने यावर औपचारिक प्रक्रिया सुरू केली आहे.


​महाराष्ट्र शासनाच्या परिवहन व बंदरे विभागाचे अपर मुख्य सचिव संजय सेठी यांनी १६ जून २०२६ रोजी केंद्र सरकारला पत्र पाठवले होते. या पत्रात दिलेल्या माहितीनुसार, २० मे २०२६ रोजी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सावंतवाडी टर्मिनसचे नाव बदलून ‘लोकमान्य मधू दंडवते टर्मिनस’ करण्याच्या प्रस्तावाला अधिकृत मंजुरी देण्यात आली होती.


​राज्य सरकारच्या या प्रस्तावाच्या आधारे केंद्रीय गृह मंत्रालयाने २७ जुलै रोजी कार्यालयीन स्मरणपत्र (Office Memorandum) जारी केले आहे. याद्वारे केंद्र सरकारने:रेल्वे मंत्रालय (रेल्वे बोर्ड),


विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय,सर्वेअर जनरल ऑफ इंडिया (डेहराडून),टपाल विभाग (Department of Posts)
​या सर्व संबंधित केंद्रीय विभागांना या प्रस्तावावर आपले अभिप्राय व मते नोंदवण्याचे निर्देश दिले आहेत.
​सर्व संबंधित विभागांचे अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची अंतिम मंजुरी मिळून सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या नवीन नामकरणाची अधिकृत अधिसूचना जारी केली जाईल, असे जारी केलेल्या नोटीस मध्ये म्हटले आहे.

शेअर करा