​सावंतवाडी : आंबोली घाटातील धोकादायक झाडे हटवून गटर साफ करा; मायकल डिसोजा यांचे वनविभागाला निवेदन

शेअर करा

​सावंतवाडी,दि.१५ जून
महामार्ग क्रमांक ५४८ एच वरील आंबोली घाटात असलेली धोकादायक झाडे तातडीने तोडण्यात यावीत आणि रस्त्या कडेची गटर साफ करताना वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून येणारे अडथळे दूर करावेत, या मागणीचे निवेदन सावंतवाडी पंचायत समितीचे सदस्य मायकल डिसोजा यांनी उपवनसंरक्षक (वनविभाग, सावंतवाडी) यांना दिले आहे.


​आंबोली घाटासह आजरा व चंदगड हद्दीपर्यंत वनविभागाच्या जागेतील रस्त्या कडेच्या धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ती तोडण्याबाबत पंचायत समितीच्या मासिक बैठकीत यापूर्वीच सूचना देण्यात आली होती. मात्र, अद्याप वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी किंवा कर्मचाऱ्यांनी यावर कोणतीही कारवाई केलेली नाही, असा आरोप डिसोजा यांनी केला आहे. गेल्या महिन्यात एका चारचाकी वाहनावर झाड कोसळले होते; सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वारंवार सूचना देऊनही याकडे अक्षम्य टाळाटाळ केली जात असून, यापुढे अपघात झाल्यास वनविभाग जबाबदार राहील, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


​तसेच, आंबोली घाटात महामार्ग विभागामार्फत गटर साफ करण्याचे काम सुरू असताना वनविभागाकडून अडथळे आणले जात आहेत. अद्याप घाटातील गटर पूर्णपणे साफ न झाल्याने पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी जाऊन घाट कोसळण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे वनविभागाने या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी डिसोजा यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनाही पाठवण्यात आल्या आहेत.

शेअर करा