तातडीने स्वच्छता मोहीम सुरू; रुग्णसेवा व व्यवस्थापनात सुधारणा झाल्याची रुग्ण व नातेवाईकांची प्रतिक्रिया
सावंतवाडी दि.१५ जून
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इशाऱ्यानंतर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय प्रशासन खडबडून जागे झाले असून, रुग्णालयात तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनसेच्या या ‘दणक्या’मुळे रुग्णालय प्रशासन पूर्णपणे ॲक्शन मोडवर आले असून, रुग्णांची काळजी घेण्यास सुरुवात झाल्याची माहिती रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी रुग्णालयात विनामूल्य सेवा देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांवर जिल्हा सिस्टर युनियन लीडर यांनी खोटे आरोप केले होते. राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांमुळे कामात अडथळा येतो, असा आरोप करत त्यांना रुग्णालयात येण्यास ताकीद देण्यात आली होती. विनाकारण बदनामी नको म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयात जाणे बंद केले. परिणामी, रुग्णालयातील व्यवस्था कोलमडून पुन्हा रुग्णांचे हाल सुरू झाले होते.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या भेटीदरम्यान रुग्णालयातील धक्कादायक वास्तव समोर आले. २४ तासांपूर्वी दाखल झालेल्या रुग्णांची डॉक्टरांनी साधी तपासणीही केली नसल्याचे दिसून आले. तसेच रुग्णालयात प्रचंड अस्वच्छता पसरली होती. त्यातच एका रुग्णाच्या बेडखाली चक्क विषारी साप आढळून आल्याने रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला.
हे गंभीर चित्र पाहून मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर यांनी तीव्र संताप व्यक्त करत डॉक्टर आणि प्रशासनाला जागेवरच खडे बोल सुनावले. रुग्णांचे आरोग्य आणि स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा थेट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला होता.
मनसेच्या या इशाऱ्याची रुग्णालय प्रशासनाने तात्काळ आणि गांभीर्याने दखल घेतली. रुग्णालय परिसर तात्काळ स्वच्छ करण्यात आला असून आजूबाजूची वाढलेली झाडीही काढण्यात आली आहे. तसेच, आता दर दोन तासांनी रुग्णांची विशेष काळजी घेतली जात असून त्यांची विचारपूस केली जात असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. रुग्णालयाला वठणीवर आणणाऱ्या मनसे जिल्हाध्यक्ष ॲड. अनिल केसरकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून जाहीर कौतुक होत आहे.