सावंतवाडी : गुरुपौर्णिमेनिमित्त सेवानिवृत्त प्राध्यापकांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार

शेअर करा

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यात माजी प्राध्यापकांना गुरुदक्षिणा अर्पण; उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागाचा स्तुत्य उपक्रम.

सावंतवाडी,दि.२९ जुलै

राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडीच्या उच्च माध्यमिक सांस्कृतिक विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त उच्च माध्यमिक विभागातील सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. गुरुपौर्णिमेला ही गुरूदक्षिणा अर्पण करण्यात आली. ज्युनिअर कॉलेजला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षीय मनोगत संस्थेचे अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी व्यक्त केले. ते म्हणाले, आरपीडीच्या प्राध्यापक, शिक्षकांनी घडवलेली मुलं आज देश-विदेशात चांगल्या हुद्द्यावर कार्यरत आहेत. शिक्षण ही सेवा समजून आमच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत त्यासाठी कारणीभूत आहे. इथल्या शिक्षकांकडून शिक्षण घेण्याचं भाग्य मलाही लाभलं. आज गुरुपौर्णिमेला गुरुजनांचा गौरव करण्यात आला असून असे गुरू या प्रशालेला लाभले याचा सार्थ अभिमान असल्याचे मत श्री. सावंत यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी सेवानिवृत्त माजी प्राचार्य व्ही. बी‌. नाईक, सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. दिनेश नागवेकर, माजी उपप्राचार्य नारायण देवरकर, प्रा.धीरेंद्र होळीकर, प्रा.सुरेश म्हसकर, प्रा.सतिश बागवे, माजी उपप्राचार्य बाळासाहेब नंदीहळ्ळी, प्रा.काकासाहेब चौगुले, प्रा.एल. पी. पाटील, प्रा. प्रवीण बांदेकर, प्रा.आर.के. संकपाळ आदींचा सन्मान गुरूपौर्णिमेच औचित्य साधून करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी मनोगत व्यक्त करत प्रशालेतील आठवणींना उजाळा दिला. संस्था सचिव तथा माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक म्हणाले, स्व. भाईसाहेब सावंत, स्व. विकास सावंत यांनी या संस्थेचा वटवृक्ष होण्यासाठी मेहनत घेतली. अनेक प्राध्यापकांनी दिलेल्या योगदानामुळे प्रशालेचा नावलौकिक सर्वदूर पसरला आहे. त्यांचा हा वारसा आजच्या पिढीतील प्राध्यापकही पुढे घेऊन जात आहेत असे गौरवोद्गार श्री. नाईक यांनी काढले. यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शालेय समिती अध्यक्ष अमोल सावंत, तसेच संस्थेचे सदस्य प्रा. सतीश बागवे तसेच मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, प्र. मुख्याध्यापक डॉ. सुमेधा नाईक, माजी विद्यार्थी म्हणून सीए लक्ष्मण नाईक, श्री. सुर्वे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्र. प्राचार्या डॉ. सुमेधा नाईक धुरी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. माया नाईक यांनी तर आभार प्रा. वामन ठाकूर यांनी मानले.

शेअर करा