प्रशासकीय मान्यता नसताना प्रकल्पाचे श्रेय घेऊ नये; नगराध्यक्षा आणि युवराज भोसले यांच्यावर शिवसेनेची टीका
सावंतवाडी,दि.२९ मे
शहराचे वैभव असलेल्या मोती तलावाच्या सुशोभीकरणा संदर्भात नगराध्यक्षा श्रद्धा सावंत-भोसले आणि युवराज लखम भोसले यांनी घेतलेली पत्रकार परिषद म्हणजे केवळ कागदावर चित्र काढून जनतेची फसवणूक करण्याचा प्रकार आहे, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी केली आहे. एखाद्या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता किंवा आराखडा मंजूर असल्याशिवाय त्याला खरी मंजुरी मिळत नाही, याचे भान त्यांनी ठेवावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना संजू परब म्हणाले की, मोती तलावाच्या सुशोभीकरणाचा असा कोणताही आराखडा नगर परिषदेच्या सभागृहामध्ये आमच्यासमोर अद्याप आलेला नाही. मुळात मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या जागेप्रमाणेच तलावाच्या या कामालाही कायदेशीर आडकाटी येणार आहे, कारण मोती तलावाचा विषय सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे नगराध्यक्षांनी मांडलेला हा विषय कधीच पूर्ण होऊ शकत नाही, ही वस्तूस्थिती आहे.
आपल्या कार्यकाळातील कामांचा दाखला देत परब पुढे म्हणाले की, मी स्वतः नगराध्यक्ष असताना मार्केट इमारत, अग्निशमन केंद्र, नळपाणी योजना यांसारख्या विविध विकासकामांची आधी रीतसर प्रशासकीय मान्यता घेतली आणि त्यानंतरच त्यावर भाष्य केले होते. आधी कोणतीही मंजुरी नसताना मी कधीही हवेत घोषणा केल्या नाहीत किंवा जाहीर केले नाही. मी उगाच कागदावर चित्र काढून जनतेची दिशाभूल केली नव्हती, असे सांगत त्यांनी सध्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार प्रहार केला.
ते पुढे म्हणाले, एवढा मोठा आणि महत्त्वाचा विषय मांडताना सत्ताधारी पक्षाचा एकही नगरसेवक त्या ठिकाणी उपस्थित नव्हता, यावरूनच हे सर्व नियोजन किती पोकळ आहे हे दिसून येते. उगाच कागदावर काहीही चित्र काढून सावंतवाडीतील जनतेची फसवणूक करू नका,आम्ही नगरपालिकेत लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक म्हणून कार्यरत आहोत, त्यामुळे याबाबात आधी नगरपालिकेच्या सभागृहात तसा प्रस्ताव ठेवावा, त्यावर आमच्या सूचना घ्याव्यात आणि नंतर तो आराखडा मंजुरीसाठी पाठवून प्रशासकीय मान्यता घ्यावी, मगच यावर भाष्य करावे, असे स्पष्ट आव्हान संजू परब यांनी नगराध्यक्षांना दिले आहे.