सावंतवाडी,दि.२ जून
येथील भटवाडीमधील ‘वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा’ यांच्या वतीने अधिकमासानिमित्त “श्री पुरुषोत्तमयाग” या आध्यात्मिक अनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले आहे. हे अनुष्ठान शनिवार, दिनांक ६ जून आणि रविवार, दिनांक ७ जून रोजी वेद पाठशाळेच्या प्रांगणात पार पडणार आहे. धर्म संस्कृतीचे संवर्धन आणि सकलजनकल्याणार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे उत्सव समितीने सांगितले.
दोन दिवसांचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:
शनिवार, ६ जून: सकाळी ८ ते १२.३० या वेळेत धार्मिक अनुष्ठान होईल. त्यानंतर सायंकाळी ६ ते ८.३० या वेळेत मठ-लांजा येथील ‘श्री लक्ष्मीपल्लीनाथ देवस्थान भक्तगणां’तर्फे आरत्या व भोवत्यांचा कार्यक्रम होईल.
रविवार, ७ जून: सकाळी ८ ते १२.३० या वेळेत धार्मिक अनुष्ठान होईल आणि दुपारी १ वाजल्यापासून महाप्रसादाचे वाटप केले जाईल.
या अनुष्ठानादरम्यान भाविकांना महाविष्णूंना तुलसीअर्पण करण्याची संधी मिळणार असून, त्यासाठी भाविकांनी स्वतः तुळशी घेऊन येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दीप दानासाठी भाविकांनी स्वतःचा दिवा सोबत आणावा. कार्यक्रमात ३०+३ वायनदानाचा उपक्रमही राबवला जाणार असून, ३५० रुपये मूल्य देऊन यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे.
वायनदान नोंदणीसाठी श्री. संदिप मुंडले (९४२२६३३२१७) व श्री. विकास जोशी (९७६३५२७३८६) यांच्याशी किंवा पाठशाळेच्या ९४०३१९३८६४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वेदशास्त्र संस्कृत पाठशाळा कार्यकारी मंडळ व उत्सव समितीने केले आहे. सर्व धर्मप्रेमींनी सहपरिवार या सोहळ्याला उपस्थित राहावे, अशी विनंती आयोजकांनी केली आहे.