​सावंतवाडीत सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त सैनिक संघातर्फे ‘कारगिल विजय दिवस’ उत्साहात साजरा

शेअर करा

भावी पिढीत देशप्रेम जागवण्यासाठी माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा: युवराज लखमराजे भोसले

​सावंतवाडी ,दि.२६ जुलै
जीवनात प्रत्येकाने देश व राष्ट्रप्रेम जागृत ठेवून कार्यरत राहिले पाहिजे. सैनिक म्हणून देशसेवा आणि देशाचे संरक्षण केल्यानंतरही माजी सैनिक समाजसेवा करत असल्याने ते खऱ्या अर्थाने सैनिकच आहेत. भावी पिढीत जाज्वल्य देशाभिमान जागृत ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यास माजी सैनिकांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन युवराज लखमराजे भोसले यांनी केले.


​सिंधुदुर्ग जिल्हा सेवा निवृत्त सैनिक संघातर्फे आयोजित ‘कारगिल विजय दिवस’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर निवृत्त लेफ्टनंट कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा, सिंधूमित्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रवीणकुमार ठाकरे, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर, बटालियन विनोदसिंह, निवृत्त सैनिक संघाचे अध्यक्ष रामचंद्र ताम्हाणकर, डॉ. अमर पोकळे, सुभेदार रामचंद्र सावंत यांसह अनेक माजी सैनिक उपस्थित होते.


​या प्रसंगी कारगिल युद्धातील वीर जवान रमेश राऊळ, वीर पत्नी सुप्रिया तेजम, तसेच वीर शुभम सावंत यांचे आई-वडील सौ. अक्षता सावंत आणि विजय सावंत यांचा विशेष सन्मान करण्यात आला.


​आपल्या मनोगतात निवृत्त कर्नल डॉ. रत्नेश सिन्हा म्हणाले की, देशाला सक्षम तरुणाईची गरज असून विद्यार्थ्यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले पाहिजे. सैन्यात आता मुलांसोबत मुलींनाही उत्तम संधी उपलब्ध आहेत. युवराज लखमराजे भोसले यांनी माजी सैनिकांच्या जमिनीचा प्रश्न लवकरच सुटेल असा विश्वास व्यक्त करत राजघराणे सदैव सैनिकांच्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली.
​डॉ. प्रवीणकुमार ठाकरे आणि राजू मसूरकर यांनी सैनिकांच्या त्यागाचा गौरव करत देशहिताला प्रथम प्राधान्य देण्याचे आवाहन केले. सुभेदार रामचंद्र सावंत यांनी भगवद्गीतेतील धैर्य आणि साहसाचा संदर्भ देत कारगिल विजयाचे महत्त्व विशद केले, तर माजी सैनिक लक्ष्मण गवळी यांनी जम्मू-काश्मीर आणि कारगिल युद्धातील लष्करी मोहिमांचा सविस्तर इतिहास मांडला.


​रॅली आणि सांस्कृतिक कार्यक्रम:


कार्यक्रमापूर्वी सावंतवाडी शहरात भव्य कारगिल विजय दिवस रॅली काढण्यात आली तसेच शहीद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. माजी सैनिकांच्या महिला सदस्यांनी स्फूर्तीगीत सादर केले, तर ध्येय अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी कारगिल युद्धातील प्रसंगांचे नाट्यीकरण सादर करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाचे आभार माजी सैनिक संजय गवस यांनी मानले.

शेअर करा