सावंतवाडी,दि.१४ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हयातील कणकवली तालुक्यातील कसवण तळवडे गावचे सुपुत्र आणि सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (अँटी करप्शन ब्युरो), मुंबई येथे पोलीस उप अधीक्षक (Dy. SP) पदावर कार्यरत असलेले प्रशांत प्रतिभा बाळकृष्ण सावंत यांना पोलीस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल केंद्रीय गृह मंत्रालयाचे सन २०२६ चे ‘अति उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर झाले आहे. या पुरस्कारामुळे कसवण तळवडे गावासह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे.
पोलीस शिपाई ते डी.वाय.एस.पी. : प्रेरणादायी प्रवास:
प्रशांत सावंत यांनी बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, पोलीस गणवेशाबद्दल असलेल्या विशेष आकर्षणापोटी सन १९९६ मध्ये ‘पोलीस शिपाई’ म्हणून सेवेत प्रवेश केला. नोकरीत असतानाच त्यांनी जिद्द आणि सातत्याच्या जोरावर MPSC परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवला. अभ्यासातील चिकाटी, उत्कृष्ट गुण आणि क्रीडा क्षेत्रातील (क्रिकेट व फुटबॉल) अनुभवाच्या जोरावर त्यांनी मैदानी परीक्षा व मुलाखत उत्तीर्ण होऊन ‘पोलीस उपनिरीक्षक’ (PSI) पदी थेट निवड मिळवली.
महाराष्ट्र पोलीस अकादमी, नाशिक येथून खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग टिळकनगर पोलीस ठाणे, चेंबूर (मुंबई) येथे झाली. त्यानंतर २०१३ मध्ये मुंबई क्राईम ब्रँच, सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर पदोन्नतीनंतर नवी मुंबई आणि पुढे दहशतवाद विरोधी पथक (ATS), मुंबई येथे त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या.
२०२१ मध्ये पुन्हा मुंबई क्राईम ब्रँच आणि २०२४ मध्ये पोलीस निरीक्षक (PI) पदावरून पोलीस उप अधीक्षक (Dy. SP) पदावर पदोन्नती मिळवून सध्या ते अँटी करप्शन ब्युरो, मुंबई येथे कार्यरत आहेत.
गाजलेली उत्कृष्ट कामिगरी
एटीएस (ATS) मध्ये कार्यरत असताना त्यांनी तब्बल २१ कोटी ३ लाख रुपये किमतीचे ७ किलो वजनाचे युरेनियम २ आरोपींसह हस्तगत केले होते. तसेच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवास्थानाजवळ सापडलेल्या जिलेटीन प्रकरणात २ आरोपींना अटक करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल वरिष्ठांकडून आतापर्यंत २०७ बक्षीसे, ८६ हजार रुपयांचे रोख पारितोषिक आणि अनेक प्रशस्तीपत्रके देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
पोलीस सेवेचा वारसा लाभलेले कुटुंब
प्रशांत सावंत यांना पोलीस सेवेचा वारसा घरातूनच लाभला आहे. त्यांचे आजोबा कै. गोपाळ रामचंद्र सावंत हे सेवानिवृत्त पोलीस होते. वडील बाळकृष्ण गोपाळ सावंत (अण्णा) हे देखील निवृत्त पोलीस असून आई श्रीमती प्रतिभा सावंत गृहिणी आहेत. त्यांचा लहान भाऊ प्रवीण बाळकृष्ण सावंत हासुद्धा मुंबई पोलीस दलात सेवेत आहे. त्यांच्या पत्नीचे नाव समिधा तर मुलीचे नाव सांची असे आहे.
जिल्ह्यातील तरुणांना मार्गदर्शनाचे आवाहन:
सिंधुदुर्ग व गावातील मुलांनी शालेय अभ्यासासोबतच MPSC व UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असा ध्यास प्रशांत सावंत यांचा आहे. जिल्ह्यातील ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाबाबत मार्गदर्शनाची गरज असेल, त्यांनी ९८२१८९८९६७ या क्रमांकावर संपर्क साधल्यास त्यांना योग्य मार्गदर्शन व मदत केली जाईल, असे आवाहन त्यांनी केले आहे.