सावंतवाडी : ‘शक्तीपीठ ‘साठी हरकती नोंदवण्याचे आवाहनस्टॅलिन दयानंद:कमी कालावधी शिल्लक

शेअर करा

सावंतवाडी, दि..१ जुलै
शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन संपादना संदर्भात हरकती आणि आक्षेप नोंदवण्यासाठी फार कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. येत्या ९ तारखेला संध्याकाळी ५:३० वाजता ही मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर, बाधित भागातील नागरिकांना आपल्या हरकती नोंदवण्यासाठी तातडीने पुढे यावे, असे आवाहन वनशक्ती संस्थेचे संचालक स्टॅलिन दयानंद यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,शासनाने या संदर्भातील अधिसूचना वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध केली असली, तरीही जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागात ही माहिती अद्याप पोहोचलेली नाही. घारपी, फुकेरी, उडेली, असनीये , झोळंबे,पडवे माजगाव यांसारख्या दुर्गम आणि डोंगराळ भागांमध्ये ही माहिती सहज पोहोचणे शक्य नाही.साहजिकच अनेक नागरिकांना या अधिसूचनेची आणि २१ दिवसांच्या मुदतीची कल्पनाच नाही.जर या निश्चित मुदतीत नागरिकांनी आपल्या हरकती नोंदवल्या नाहीत, तर नंतरच्या काळात घरदार आणि जमिनी वाचवण्यासाठी कोणतीही कायदेशीर दाद मागण्यात अडचणी येणार आहेत. या महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बागायती जमिनी, पाण्याचे स्त्रोत, घरे आणि मंदिरे जात आहेत. अद्याप या मालमत्तांचे योग्य मूल्यमापन देखील झालेले नाही. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी हरकती घेणे अत्यंत गरजेचे असल्याचे यात म्हटले आहे.
दुर्गम भागातील नागरिकांना हरकती नोंदवताना कोणतीही अडचण येऊ नये, म्हणून विविध गावांमधील स्थानिक प्रतिनिधी नागरिकांना मदत करणार आहेत. नागरिकांनी तातडीने खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:संदिप सावंत, (असनीये),अभय देसाई (डेगवे),
राजेश गवस (झोळंबे),राजेश विरनोडकर ( बांदा), शंभा आईर, (फुकेरी ),अरुण सोनू मोर्ये (बांदा), भगवान देसाई (पडवे माजगाव),समीर कोलते (असनीये ),शरद सावंत( असनीये ) हे सर्व हरकती नोंदविण्यासाठी सहकार्य करतील असे त्यांनी म्हटले आहे.

शेअर करा