मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग, कोकण रेल्वे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनसच्या रखडलेल्या कामांवरून ‘रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी केंद्र व राज्य सरकारवर तीव्र टीका करत कोकणातील पायाभूत विकासाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला.
सावंतवाडी दि.२६ जून
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम, कोकण रेल्वेचे विलीनीकरण आणि सावंतवाडी टर्मिनसच्या अपूर्ण कामावरून ‘रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदे’चे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू सारखे मोठे प्रकल्प काही वर्षांत पूर्ण होतात, मात्र कोकणातील पायाभूत प्रकल्पांच्या बाबतीत केंद्र व राज्य सरकारकडून सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्रीकांत सावंत यांनी म्हटले आहे की, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होऊन १७ वर्षे उलटली तरी तो अद्याप पूर्ण झालेला नाही. दुसरीकडे, समृद्धी महामार्ग अवघ्या ४ वर्षांत आणि अटल सेतूही विक्रमी वेळेत पूर्ण केला जातो. हा दुजाभाव कोकणवासीयांच्या जखमेवर मीठ चोळणारा आहे.
कोकण रेल्वेच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सांगितले की, ठरलेल्या अटीनुसार १० वर्षांनंतर कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण होणे आवश्यक होते, मात्र अद्याप ही प्रक्रिया रखडलेली आहे. तसेच, २०१५ मध्ये तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले होते. या घटनेला आता ११ वर्षे पूर्ण होत आली, तरीही टर्मिनसचे काम अपूर्णच आहे. हे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
कोकणच्या आर्थिक विकासासाठी सागरी पर्यटनाला चालना देणे गरजेचे असल्याचे सांगत सावंत म्हणाले की, कोकणचा समुद्रकिनारा अतिशय सुंदर आहे. जर येथील सर्व बंदरांचा आधुनिक सुविधांसह विकास केला, तर देशांतर्गत पर्यटकांसह परदेशी पर्यटकही मोठ्या संख्येने कोकणाकडे आकर्षित होतील. यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होऊन कोकणच्या पर्यायाने देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागेल.
निधीअभावी कोकणातील अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प रखडलेले आहेत. त्यामुळे आता कोकणवासीयांनी राजकीय मतभेद विसरून, संघटित होऊन आपल्या हक्कांसाठी लढण्याची वेळ आली आहे, तरच कोकणचा सर्वांगीण विकास शक्य होईल, असे आवाहन श्रीकांत सावंत अध्यक्ष, मानवता विकास परिषद व कार्यवाह, राष्ट्रसंत पाचलेगावकर महाराज सेवा समिती यांनी केले आहे.