सावंतवाडी,दि.२९ जुलै
सावंतवाडी शहर स्वच्छ, निरोगी, सुंदर व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सावंतवाडी नगर परिषदेतर्फे ‘घनकचरा व्यवस्थापन नियम, २०१६’ ची काटेकोर अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. शहरातील सर्व नागरिक, व्यापारी, संस्था, गृहनिर्माण संस्था आणि आस्थापनांना कचऱ्याचे वर्गीकरण करूनच तो नगर परिषदेकडे देणे बंधनकारक करण्यात आले आहे.
नगर परिषदेने दिलेल्या सूचनेनुसार, कचऱ्याचे वर्गीकरण चार प्रकारांत करून देणे आवश्यक आहे:
ओला कचरा: भाजीपाला, फळांची साले, उरलेले अन्न, फुले, बागेतील जैविक कचरा इत्यादी.
सुका कचरा: कागद, प्लास्टिक, काच, पॅकेजिंग साहित्य, पुठ्ठा इत्यादी.
सॅनिटरी कचरा: सॅनिटरी पॅड, डायपर्स, मास्क इत्यादी (हे स्वतंत्र पिशवीत बांधून देणे आवश्यक).
विशेष/घातक कचरा: बॅटरी, बल्ब, CFL, औषधे, रंगाचे डबे, कीटकनाशके इत्यादी.
मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांवर (Bulk Waste Generators) विशेष जबाबदारी
२०,००० चौरस मीटर किंवा त्याहून अधिक क्षेत्रफळ असलेल्या इमारती, दररोज ४०,००० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरणाऱ्या संस्था, किंवा दररोज १०० किलोग्रॅमपेक्षा जास्त कचरा निर्माण करणारे हॉटेल्स, रुग्णालये, शैक्षणिक व व्यापारी संकुले यांना ‘बल्क वेस्ट जनरेटर’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. अशा संस्थांना त्यांच्या परिसरातील ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग किंवा बायोगॅसद्वारे वैज्ञानिक प्रक्रिया करणे बंधनकारक असणार आहे. तसेच सुका कचरा पुनर्वापरासाठी नगर परिषद किंवा अधिकृत संस्थेकडे द्यावा लागणार आहे.
या गोष्टींवर असणार कडक बंदी:
सार्वजनिक ठिकाणी, रस्ते, नाले, गटारे व जलसोतांमध्ये कचरा टाकणे.
ओला व सुका कचरा एकत्र करून देणे.
कचरा जाळणे किंवा बांधकामाचा व पाडकामाचा कचरा सार्वजनिक ठिकाणी टाकणे.
नगर परिषदेच्या कचरा संकलन वाहनास सहकार्य न करणे.
घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था किंवा आस्थापनांविरुद्ध ‘पोल्युटर पेझ प्रिन्सिपल’ (Polluter Pays Principle) नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिला आहे. सावंतवाडी शहराला पर्यावरणपूरक ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी कचरा वर्गीकरणात सहकार्य करावे, असे आवाहनही नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.