सावंतवाडी,दि.१५ जुलै
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सून गिरीजा गीतेश राऊत यांनी सासरच्या मंडळींविरोधात दाखल केलेल्या जादूटोणा आणि अघोरी प्रथा छळप्रकरणी ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी आणखी एकाला अटक केली. कोलगाव येथील संशयित आरोपी फिरोज बाबा याला मदत करणाऱ्या राम वडार (रा. कोलगाव) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या अटकेमुळे फिरोज बाबाच्या अघोरी कारभाराचे अनेक धक्कादायक प्रकार उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याप्रकरणी गिरीजा राऊत यांनी पती गीतेश राऊत, सासरे विनायक राऊत यांच्यासह सासरच्या काही जणांविरोधात शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ तसेच अघोरी प्रथांचा वापर केल्याची तक्रार ठाणे पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी रविवारी (दि. १२) सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथून संशयित तांत्रिक फिरोज आदम शेख उर्फ फिरोज बाबा याला अटक केली होती.
फिरोज बाबाच्या पोलीस कोठडीत झालेल्या चौकशी दरम्यान, त्याला या कृत्यांमध्ये मदत करणाऱ्या सावंतवाडी तालुक्यातील इतर काही जणांची नावे समोर आली. त्याआधारे ठाणे पोलिसांच्या पथकाने मंगळवारी कोलगाव येथील राम वडार याला ताब्यात घेऊन चौकशीनंतर अटक केली.
दरम्यान, तपासाचा भाग म्हणून ठाणे पोलिसांनी फिरोज बाबाच्या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि त्याचे रेकॉर्डिंग जप्त केले असल्याची माहिती समोर येत आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या विश्लेषणातून आणि पुढील तपासातून या गुन्ह्यात आणखी काही मोठी माहिती आणि नावे समोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.