सावंतवाडी : फिरोज बाबाला घेऊन ठाणे पोलीस कोलगावात; घरासह जादूटोण्याच्या जागांची केली झाडाझडती

शेअर करा

सावंतवाडी, दि. १५ जुलै
माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीनंतर अघोरी कृत्यांच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कोलगाव येथील फिरोज शेख उर्फ फिरोज बाबा याला घेऊन ठाणे पोलिसांचे पथक आज बुधवारी पुन्हा एकदा कोलगाव येथे दाखल झाले. पोलिसांनी फिरोज बाबाच्या राहत्या घरासह जादूटोण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या इतर जागांची प्रत्यक्ष पाहणी करत इत्यंभूत माहिती जाणून घेतली. सलग दोन दिवस ठाणे पोलिसांकडून कोलगावात सुरू असलेल्या या झाडाझडतीमुळे या प्रकरणाचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


​ माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने केलेल्या जादूटोणा आणि अघोरी प्रथांच्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे. ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने मंगळवारी मुख्य संशयित आरोपी भोंदू फिरोज बाबा शेख याच्या कोलगाव येथील घराची कसून झडती घेतली होती. त्यानंतर या कृत्यात त्याला साथ देणारा त्याचा मुख्य साथीदार राम यल्लाप्पा वडार यालाही पोलिसांनी कोलगाव येथून ताब्यात घेऊन अटक केली होती.


​ आज बुधवारी पुन्हा एकदा ठाणे पोलिसांचे पथक स्थानिक पोलिसांच्या मदतीने कोलगावात दाखल झाले. पोलिसांनी फिरोज बाबाला सोबत घेऊन तो नेमके कोणत्या ठिकाणी कोणती अघोरी कृत्ये करायचा, याची घटनास्थळी प्रत्यक्ष जाऊन माहिती घेतली. सर्व जागांची कसून पाहणी आणि चौकशी केल्यानंतर पोलीस पथक ठाण्याच्या दिशेने रवाना झाले.


​या प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचा मुलगा गितेश राऊत यांच्यासह इतर आरोपींविरुद्ध ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. याच तपासाचा भाग म्हणून ठाणे पोलिसांनी ही धडक कारवाई केली. या अघोरी आणि जादूटोणा प्रकरणात पडद्यामागून फिरोज बाबाला आणखी कोणी मदत केली होती का, राऊत यांच्या कुटुंबीयांना त्याच्यापर्यंत कोणी आणले होते, तसेच यात काही राजकीय लोकांचा सहभाग आहे का, याचा शोध आता ठाणे पोलीस घेत आहेत. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणाची व्याप्ती वाढून काही ‘बडे मासे’ गळाला लागण्याची आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शेअर करा