आयुष ओपीडीसाठी नगरपालिकेने जास्तीत जास्त सहकार्य करावे; सावंतवाडीच्या आरोग्यदायी भविष्यासाठी केंद्राचे योगदान महत्त्वाचे
सावंतवाडी दि.१५ सप्टेंबर
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा यांचे महाराष्ट्रातील पहिले आयुष ओपीडी केंद्र
नगरपालिकेच्या सहकार्याने सावंतवाडीत होत आहे याचा आनंद आहे. सावंतवाडी शहराची जनता आजही आयुर्वेदिक उपचारांवर विश्वास ठेवते त्यासाठी नगरपालिकेचा दवाखाना एवढी वर्षे सुरू होता. सावंतवाडी शहरामध्ये हेल्थ फार्म, पंचकर्म सेंटर, आयुर्वेद मेडिकल कॉलेज असून आता आयुषची ओपीडी देखील सुरू होत आहे त्यामुळे सावंतवाडी ही आयुर्वेदिक भूमी म्हणून ओळखली जाईल. सावंतवाडी आरोग्यदायी राहिली पाहिजे तर या ओपीडीचे योगदान महत्वाचे आहे त्याकरिता नगरपालिकेने जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन माजी मंत्री,आमदार दिपक केसरकर यांनी केले.
केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालय व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा यांची आयुष ओपीडी सावंतवाडीत होत असून याबाबत सावंतवाडी नगरपालिका व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा यांच्यात नगरपालिका सभागृहात मंगळवारी सामंजस्य करार पार पडला. सावंतवाडी मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने तर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवाच्या डीन सुजाता कदम यांनी धारगळ आयुर्वेद संस्थांनच्या वतीने या सामंजस्य करारांवर एकाच वेळी सह्या केल्या.
यावेळी आमदार केसरकर म्हणाले सावंतवाडीत आयुष मंत्रालयाचे होणारे बाह्यरुग्ण विभाग हे महाराष्ट्रातील पहिले केंद्र आहे. यासाठी महाराष्ट्राचे आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांना श्रेय द्यावे लागेल त्यांनी केंद्र सरकार व आयुष मंत्रालयाशी पाठपुरावा केल्याने हे शक्य झाले. आरोग्य सेवेत नेहमीच अग्रेसर असणारे नगरसेवक देव्या सूर्याजी यांनी आयुष ओपीडीची मागणी वारंवार लावून धरली त्यामुळे आता सावंतवाडीत आयुषची ओपिडी सुरू होणार आहे. गोवा धारगळ येथे माजी केंद्रीय आरोग्य व आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सर्वात मोठ आयुर्वेदिक हॉस्पिटल उभे केले आहे दोडामार्ग एमआयडीसी मधील ५० एकर जागा आयुष मंत्रालयाला आपण त्यावेळी दिलेली असून या जागेत जास्तीत जास्त सुविधा निर्माण होऊन हेल्थ पार्क,योगा सेंटर सुरू करण्याचा विचार व्हावा. सावंतवाडीत आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे शिवाय पालिकेचे हेल्थ फार्म, पंचकर्म सेंटर आहे आणि आता आयुषचा बाह्यरुग्ण विभाग होत असल्याने येथील आयुर्वेदिक पर्यटनाला चालना मिळेल. या ओपीडी साठी अधिक सोयी सुविधा जागा नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नागरिकांना या ओपीडीतीन मोफत उपचार औषधे उपलब्ध करून दिली जाणार आहेत.हळूहळू येथे गोवा धारगळ आयुर्वेद संस्थान वरून स्पेशलिस्ट डॉक्टर येऊन तपासणी करतील आवश्यकता भासली तर इथे शस्त्रक्रिया होतील. सिंधुदुर्ग मधील चाळीस टक्के लोक जे गोव्यात उपचारासाठी जातात त्यांचा त्रास कमी होईल असे यावेळी केसरकर यांनी बोलताना सांगितले.
नगराध्यक्षा सौ श्रद्धाराजे भोसले यांनी आयुष ओपीडी मुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहील. आमदार केसरकर यांनी सर्व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने चांगला निर्णय घेतला आहे. आरोग्य विभागाच्या जागेत ही ओपीडी सुरू होईल, ऑक्टोबर मध्ये याद्वारे रुग्णांना सेवा दिली जाईल असे आश्वासन दिले.
केंद्र सरकार आयुष मंत्रालयाचे संचालक डॉ प्रदिपकुमार प्रजापती यांनी आयुषची पहिली ओपीडी महाराष्ट्रात सावंतवाडी येथे होते याचा आनंद होत आहे. धारगळ गोवा येथील आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व संशोधन केंद्रात सिंधुदुर्ग मधील चाळीस टक्के रुग्ण उपचारासाठी येतात. त्यामुळे आयुषच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोव्याचा बाह्यरुग्ण विभाग सावंतवाडीत सुरू करावा अशी मागणी होती. येथील आमदार दिपक केसरकर यांनी ही मागणी राज्य व केंद्र स्तरावर लावून धरली त्यामुळे आता आयुष ओपीडी सुरू होत आहे. जसजशी जागा मिळेल त्यानुसार या ठिकाणी आम्ही अधिक सुविधा देणार आहोत. आयुर्वेदा मध्ये अधिक ताकद असून आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतल्यास त्याचा रुग्णांना निश्चितच फायदा होतो आमची टीम लवकरच येथे नवा सेट अप सुरू करून
ओपीडीद्वारे येथील लोकांना आरोग्य सुविधा देईल उपचार करेल असे डॉ प्रजापती यांनी सांगितले.
अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान धारगळ गोवा हॉस्पिटलच्या डीन डॉ सुजाता कदम यांनी धारगळ येथे उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये सिंधुदुर्गातील रुग्णांची संख्या जास्त आहे. सावंतवाडी येथे या संस्थानचे एक युनीट म्हणजेच ओपीडी सुरू व्हावी असा प्रस्ताव आला होता. आयुष मंत्रालयातून संचालक डॉ प्रजापती यांनी हा प्रस्ताव मागवून घेत त्याला मान्यता दिली. आयुर्वेद संस्थान मार्फत एम्स, लवासा सारख्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये आयुषचे युनिट सुरू आहे तर सुप्रीम कोर्ट मध्ये देखील युनिट सुरू आहे. महाराष्ट्रात आपले एक युनिट सावंतवाडीत सुरू होईल याचा आनंद होत असून हळूहळू संपूर्ण देशात याची व्याप्ती वाढत जाईल.सावंतवाडी ओपीडी मधून पंचकर्म, शस्त्रक्रिया, या सुविधा हळूहळू सुरू होतील याचा फायदा सावंतवाडी शहर व आसपासच्या गावांना होईल असे त्या म्हणाल्या.
आयुष हॉस्पिटल धारगळ गोवा संस्थानचे प्रोफेसर डॉ विनायक चकोर यांनी सावंतवाडी येथे ओपीडी सुरू करण्यास जागेमुळे विलंब झाला. आता बांबू युनिट सेंटर ही इमारत मध्ये जागा निश्चित केली आहे. गणपती सणासुदीच्या काळात सामंजस्य करार झाला. या ओपीडी द्वारे मोफत औषध, उपचार तपासणी सेवा दिली जाईल तर एक ऑक्टोबर पासून ओपीडी सुरू करत आहोत अशी माहिती दिली. यावेळी सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती सौ दिपाली भालेकर, उद्यान व पर्यटन सभापती मोहिनी मडगावकर, सभापती प्रतीक बांदेकर नगरसेवक देव्या सूर्याजी, सिद्धार्थ भांबुरे, नगरसेविका सौ शर्वरी धारगळकर, सौ स्नेहा नाईक आदी उपस्थित होते.