सावंतवाडी,दि.०१ जुलै
सावंतवाडी शहर परिसरासह तालुक्यात मंगळवारपासून पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. तालुक्यातील असनिये आणि तांबोळी गावांत झाडे कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री झालेल्या प्रचंड वादळामुळे असनिये येथील रहिवासी सावित्री साबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर नारळाचे झाड कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्या घराचे छप्पर आणि भिंतीचे मोठे नुकसान झाले असून, सुमारे २०,००० रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दुसऱ्या एका घटनेत, तांबोळी येथील श्रीमती मायावती प्रभाकर देसाई यांच्या शेतमांगरावर (शेतघरावर) सागवानाचे मोठे झाड उन्मळून पडले. या दुर्घटनेत शेतमांगराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, यामध्येही सुमारे २०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.
कालपासून सुरू असलेल्या या धुवांधार पावसामुळे तालुक्यातील अनेक भागांत झाडे आणि विजेचे खांब पडल्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे काही काळ वीजपुरवठाही खंडित झाला होता. महसूल विभागाच्या वतीने नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले असून, बाधितांना तातडीने शासकीय मदत मिळावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.