सावंतवाडी, दि. २७ मे
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू या प्रमुख पिकांच्या बरोबरीने शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लावणारे ‘कोकम’ पीक यंदा अवकाळी पाऊस आणि बदलत्या हवामानामुळे संकटात सापडले आहे. सावंतवाडी तालुक्यात चालू वर्षी कोकमच्या उत्पादनात कमालीची घट झाली असून, गेल्या वर्षी ३० ते ४० टन होणारे उत्पादन यंदा २० टनांवरही पोहोचलेले नाही. परिणामी, बाजारपेठेत कोकमचे दर गगनाला भिडले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ला आणि कुडाळ हे तालुके कोकम उत्पादनात आघाडीवर आहेत. कोकम हे येथील शेतकऱ्यांचे प्रमुख पीक नसले, तरी जोडधंदा म्हणून बागायतदार याची आवर्जून लागवड करतात आणि त्यातून मोठा नफा मिळवतात. मात्र, यंदा हवामानातील बदलांमुळे सरासरी उत्पादनही निघालेले नाही. सध्या बाजारपेठेत कोकम सोलचे दर ६०० रुपये प्रति किलो, तर आगळ १ हजार रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. घाऊक आणि किरकोळ विक्रीसाठी यावर प्रक्रिया केली जात असल्याने, आगामी काळात हे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. कोकमचा वापर घरगुती अन्नपदार्थ, ज्यूस, सरबत आणि औषधांसाठी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने या दरवाढीचा थेट फटका ग्राहकांना बसत आहे.
शासकीय अनास्थेमुळे कोकम उत्पादक अडचणीत
सावंतवाडी तालुक्यात एकूण १९५ हेक्टर क्षेत्रावर सुमारे ३७० शेतकरी कोकमची लागवड करतात. एकदा लागवड केल्यानंतर वर्षानुवर्षे उत्पन्न देणारे हे पीक आहे. सिंधुदुर्गातील कोकमला ‘जी आय टॅग’ (भौगोलिक मानांकन) मिळालेले असूनही शासनाकडून या पिकावर नेहमीच अन्याय होत असल्याची भावना बागायतदारांमध्ये आहे. कोकमची लागवड विखुरलेल्या पद्धतीने होत असल्याने शासनाकडे याची ठोस आकडेवारी उपलब्ध नसते. इतर पिकांप्रमाणे या पिकाची नोंद ठेवली जात नाही. शासन लागवडीसाठी काही प्रमाणात सबसिडी देते, परंतु अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यास आंबा-काजू प्रमाणे कोकमला कोणतीही नुकसान भरपाई दिली जात नाही.
प्रक्रिया उद्योगांची गरज आणि मजुरांची टंचाई
कोकमचे फळ काढल्यानंतर त्याचे सोल काढणे, सुकवणे या प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. मात्र, ग्रामीण भागातून रोजगारासाठी शहरांकडे झालेल्या स्थलांतरामुळे सध्या मजुरांची तीव्र टंचाई जाणवत आहे. शासनाने आंबा आणि काजू प्रमाणेच कोकमची दर्जेदार रोपे पुरवावीत, तसेच कोकम प्रक्रियेसाठी आधुनिक ‘ड्रायर सुविधा’ आणि ‘प्रक्रिया युनिट्स’ (Processing Units) उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना मोठी मदत होईल.
पारंपरिक कोकम व्यवसाय टिकवून ठेवण्यासाठी आणि लागवड क्षेत्र वाढवण्यासाठी कृषी विभागाने आता ठोस पावले उचलणे अत्यंत गरजेचे बनले आहे. त्यातच, यंदा पाऊस लवकर सुरू झाल्यास उरलेल्या पिकालाही मोठा फटका बसेल, अशी भीती स्थानिक बागायतदारांकडून व्यक्त केली जात आहे.