सावंतवाडी : गौण खनिज नियमांचे उल्लंघन: विलवडे येथील चार उत्खननदारांना ५.५० कोटींचा दंड; नायब तहसीलदारांची कारवाई

शेअर करा

सावंतवाडी दि.२४ जुलै
गौण खनिज नियमांचे उल्लंघन करून मंजूर क्षेत्रापेक्षा जास्त अथवा मुदतीनंतर उत्खनन केल्याप्रकरणी सावंतवाडी तालुक्यातील विलवडे येथील चार उत्खननदारांना पाच कोटी ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी या दंडात्मक कारवाईच्या नोटिसा बजावल्या आहेत.


​कारवाई झालेल्यांमध्ये कालिदास दळवी, विनायक दळवी, गौरव काणेकर आणि सखाराम मोरजकर यांचा समावेश आहे. अल्प मुदत गौण खनिज परवान्याची मुदत संपल्यानंतरही उत्खनन चालू ठेवणे आणि मंजूर मर्यादेपेक्षा जास्त उत्खनन करणे, या कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे.


​उपसंचालक (प्रादेशिक कार्यालय, कोल्हापूर) यांच्यामार्फत ई.टी.एस. (ETS) मशीनद्वारे करण्यात आलेल्या मोजणी अहवालात हे अतिरिक्त उत्खनन उघडकीस आले. जिल्हा खनिकर्म अधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या अहवाल व पत्राच्या आधारे सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाने ही पावले उचलली आहेत.


​मोजणीत तफावत आढळल्याने संबंधित चारही चालकांचे ऑनलाईन ई-टीपी (E-TP) पास तात्काळ बंद करण्यात आले आहेत. तसेच दंडात्मक तफावतीची रक्कम सात दिवसांच्या आत शासकीय खात्यात जमा करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत. ही रक्कम जमा करेपर्यंत संबंधितांना कोणताही नवीन गौण खनिज परवाना दिला जाणार नाही. विहित मुदतीत दंडाची वसुली न झाल्यास मालमत्ता जप्ती अथवा इतर कठोर प्रशासकीय कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे.


​गौण खनिज नियमांचे काटेकोर पालन व्हावे आणि बेकायदेशीर किंवा अतिरिक्त उत्खननाला आळा बसावा, यासाठी प्रशासनाकडून ही कडक कारवाई करण्यात आली आहे.


विलवडे येथील ग्रामस्थांनी आंदोलन छेडले होते तसेच सी ए साईप्रसाद कल्याणकर यांनी चौकशीसाठी पाठपुरावा केला होता. साईप्रसाद कल्याणकर यांनी दंडात्मक कारवाई केली असली तरी वसुली जलदगतीने झाली पाहिजे अशी मागणी केली आहे.

शेअर करा