पाळणेकोंड धरण अजूनही एक मीटरने रिकामे
सावंतवाडी,दि.०९ ऑगस्ट
सावंतवाडी शहराला मुख्यत्वे पाणी पुरवठा करणारे पाळणेकोंड धरण यंदा ऑगस्ट महिना उजाडला तरी पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. पावसाचे वेळापत्रक पार कोलमडल्यामुळे पाळणेकोंड धरण अद्याप ओव्हरफ्लो झाले नसून, धरणातील पाणी पातळी अजूनही एक मीटरने कमी आहे. आगामी काळात जर पावसाने ओढ दिली अथवा हंगाम कोरडा राहिला, तर आगामी काळात सावंतवाडी शहरवासीयांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीपासूनच पावसाचा लहरीपणा पाहायला मिळत आहे. मुसळधार आणि सलग पावसाचा अभाव असल्याने पाळणेकोंड धरणातील पाणी साठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. दरवर्षी या कालावधीत धरण भरून ओव्हरफ्लो होते, मात्र यंदा धरणात अजूनही एक मीटर पाणी कमी असल्याने नगरपरिषद प्रशासनाची चिंता वाढली आहे.
दुसऱ्या बाजूला, सावंतवाडी शहरात ५७ कोटी रुपयांच्या नवीन नळपाणी पुरवठा योजनेचे काम सुरू असून, या कामातील विविध त्रुटी आणि संथ गतीमुळे आधीच नागरिकांना पाणीटंचाई तसेच रस्ते खोदाईच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यातच आता मुख्य जलस्रोत असलेले पाळणेकोंड धरणच पूर्ण न भरल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
येत्या दिवसांत मुसळधार पाऊस झाला नाही आणि धरणातील पाणी पातळी पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचली नाही, तर नगरपरिषदेला उर्वरित वर्षात शहराचा पाणी पुरवठा नियोजनबद्ध ठेवताना मोठी कसरत करावी लागणार आहे. संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी आतापासूनच धरणातील पाण्याचा साठा नियंत्रित करणे आणि योग्य नियोजन आखणे नगरपरिषद प्रशासनासमोर मोठे आव्हान ठरणार आहे.