रात्रीच्या सुमारास मानवी वस्तीत प्रवेश; नागरिकांची धावपळ, परिसरात खळबळ उडाली.
सावंतवाडी, दि. २ जून
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वन्य हत्ती ‘ओंकार’चे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाले असून, त्याच्या या वावरामुळे संपूर्ण परिसरात कमालीचे भीतीचे वातावरण पसरले आहे. काल रात्रीच्या सुमारास ओंकार हत्ती थेट मानवी वस्तीत आल्याने नागरिकांची मोठी धावपळ उडाली आणि एकच खळबळ माजली.
ओंकार हत्ती सध्या वेत्ये गावातील विविध भागांत फिरत आहे. सलगच्या वावरामुळे त्याला ही ग्रामीण लोकवस्ती देखील जंगलासारखीच भासू लागली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. हत्तीचा मार्ग आणि त्याच्या हालचालींची पूर्ण माहिती असूनही वन विभाग याकडे सोयीस्कर डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांमधून होत आहे. वन विभागाच्या संथ भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात असून, प्रशासकीय यंत्रणा या गंभीर समस्येकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र आहे.
ओंकार हत्तीचा मानवी वस्तीतील वावर पाहता, वन विभागाने तातडीने हालचाली करून एकतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात (जंगलात) हुसकावून लावावे किंवा त्याची पकड मोहीम राबवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील धोका टाळण्यासाठी वनविभागाने तात्काळ ‘ओंकार’चा बंदोबस्त करावा, अशी आग्रही मागणी आता ग्रामस्थांकडून केली जात आहे.