वेताळ बांबर्डे-पावशी गावच्या सीमेवर घडली घटना
चालकाचे प्रसंगावधान; सर्पमित्र दिवाकर बांबर्डेकर यांनी सापाला पकडून सुखरूप सोडले नैसर्गिक अधिवासात
कुडाळ,दि.२७ जुलै
तळेरे ते गोवा अशा प्रवास करणाऱ्या टूरिस्ट कारच्या बॉनेटमध्ये साप (तस्कर किंवा सोंगट्या साप) आढळल्याची खळबळजनक घटना आज सकाळी ९.३० च्या सुमारास महामार्गावरील वेताळ बांबर्डे आणि पावशी गावच्या सीमेवर घडली. कारच्या बॉनेटमध्ये लपून बसलेला साप अचानक समोरील काचेवर आल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान दाखवून कार महामार्गाच्या बाजूला थांबवून सापाची शेपटी पकडून ठेवली. याबाबतची माहिती स्थानिक ग्रामस्थ रिझवान उस्मान शेख यांनी सर्पमित्र दिवाकर रमाकांत बांबर्डेकर (कुडाळ आरआरटी) यांना दिली. दिवाकर बांबर्डेकर यांनी तत्काळ घटनास्थळी येऊन त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले. हा साप बिनविषारी असून याला “तस्कर” असे म्हटले जाते. हा साप दिसण्यास सुंदर असून याचा उपद्रव नाही. हा साप प्रामुख्याने लहान उंदीर, पाली, सरडे, बेडूक आणि लहान पक्षी किंवा त्यांची अंडी खातो. घराच्या आसपास लपत-छपत येऊन पाली पकडण्याच्या त्याच्या या ‘चोरीसारख्या’ सवयीमुळे त्याला मराठीत ‘तस्कर’ (चोर) हे नाव पडले आहे, अशी माहिती दिवाकर बांबर्डेकर यांनी दिली.
