आ. रविंद्र फाटक यांची पालकमंत्र्यांकडे मागणी ; विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही , पालकमंत्र्यांचे आश्वासन
सिंधुदुर्ग ,दि.२८ जुलै
देवगड तालुक्यातील मिठबाव येथील ग्रामदैवत श्री गजबादेवी मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना आ. रविंद्र फाटक यांनी महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची मंत्रालयात सदिच्छा भेट घेतली. यावेळी मंदिराच्या विकासकामांसह परिसर सुशोभीकरणाच्या उर्वरित कामांबाबत निवेदन दिले. यावेळी श्री गजबादेवी मंदिराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले आहे.
श्री गजबादेवी मंदिर हे देवगड तालुक्यातील भाविकांचे महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे. या ठिकाणी अथांग समुद्र लागलेला असलेल्यामुळे पर्यटकांचा ओघ देखील मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे मंदिराचा सर्वांगीण विकास, परिसराचे सुशोभीकरण तसेच भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आ. रविद्र फाटक यांनी केली. यावेळी सकारात्मक चर्चा झाली आहे.