मंडळाच्या प्रगतीसाठी आणि सहकारी चळवळीच्या बळकटीसाठी सर्वतोपरी सहकार्य – मनीष दळवी
सिंधुदुर्ग,दि.३० जुलै
सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळ मर्यादित सिंधुदुर्ग या संस्थेच्या सन २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कालावधीसाठीच्या नूतन कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली. गुरुवारी सिंधुदुर्गनगरी, ओरोस येथील मंडळाच्या कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.या निवडीत गजानन संभाजी सावंत यांची अध्यक्षपदी तर विनोद रामचंद्र मर्गज यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. मंडळाच्या प्रगतीसाठी आणि सहकारी चळवळीच्या बळकटीसाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. टी. चौगुले यांनी कामकाज पाहिले.निवडीनंतर सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
नवनिर्वाचित अध्यक्ष गजानन सावंत आणि उपाध्यक्ष विनोद मर्गज यांनी आपल्या मनोगतात जिल्ह्यातील सहकारी संस्था अधिक सक्षम करण्यासाठी सभासद, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि सेवक यांना बदलत्या काळानुसार आधुनिक सहकारी शिक्षण व प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यावर भर दिला. सहकार क्षेत्र अधिक कार्यक्षम, सक्षम आणि गतिमान करण्यासाठी मंडळामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नूतन संचालक मंडळात विलासराव ऐनापुरे, गजानन गावडे, मधुसुदन गावडे, सुभाष तळवडेकर, केशव नारकर, प्रकाश सावंत, सुरेश चौकेकर यांची संचालक म्हणून, तर कुंदा पै आणि प्रज्ञा परब यांची संचालिका म्हणून बिनविरोध निवड झाली. यावेळी जिल्हा सहकार विकास अधिकारी मंगेश रा. पांचाळ यांच्यासह सहकार क्षेत्रातील पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.