सिंधुदुर्ग : आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

शेअर करा

 सिंधुदुर्ग,दि. २१ जून
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक लोक तणाव, चिंता आणि विविध आजारांनी त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत योग हा निरोगी आणि आनंदी जीवनाचा एक प्रभावी मार्ग आहे. योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधण्यास मदत करते, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे यांनी केले.

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त आज जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी, जिल्हा आयुष विभाग, मेरा युवा भारत, एन. सी. सी. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा क्रीडा संकुलात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उद्घाटन कार्यक्रमाच्या वेळी अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा परिषद सदस्य, सुप्रिया वालावलकर, अधिष्ठाता डॉ संतोष कुपरे, तनुज मंडलिक, लेफ्टनंट कर्नल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी, तालुका क्रीडा अधिकारी प्रविण वानखेडे, महाव्यवस्थापक, उद्योग श्रीपाद दामले, क्रीडा अधिकारी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. कृपा गावडे, ‘माय भारत’ राज्य क्रीडा मार्गदर्शक, माधुरी गराळ च्या जिल्हा समन्वयक अपेक्षा मांजरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय आणि NCC चे विद्यार्थी देखील उपस्थित होते.

नियमित योगाभ्यासामुळे शरीर लवचिक आणि सुदृढ बनते. विविध योगासने केल्याने स्नायू मजबूत होतात, रक्ताभिसरण सुधारते आणि शरीराची कार्यक्षमता वाढते. तसेच योगामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणा यांसारख्या आजारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. योग हा फक्त व्यायाम नसून योगामुळे शारिरीक, मानसिक आरोग्य सुदृढ राहते. नियमित योगासने केल्याने शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. योगामुळे मन:शांती तर मिळतेच शिवाय तणाव दूर होऊन एकाग्रता सुध्दा वाढण्यास मदत होते, असेही अप्पर जिल्हाधिकारी म्हणाले.

यावर्षीच्या योग दिनाचे “निरोगी वृद्धत्वासाठी योग” हे घोषवाक्य आहे. केंद्र शासनामार्फत निर्गमित करण्यात आलेल्या Common Yoga Protocol नुसार आयुष विभागाच्या योग शिक्षिका श्रीमती साधना गुरव व रवींद्र पावसकर, पतंजली यांनी प्रार्थनेने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात झाली.


यावेळी योग पूर्व व्यायाम प्रात्यक्षिकासह प्राणायाम, नाडी शोधन क्रिया, भ्रामरी हे योग प्रकार करुन घेण्यात आले. त्यानंतर ध्यानसाधना करण्यात आली. उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेऊन योगासने केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कृपा गावडे, जिल्हा आयुष अधिकारी यांनी केले आणि आभार प्रदर्शन तुषार परब, माय भारत यांनी केले.

शेअर करा