सिंधुदुर्ग : मुंबईत २५ नोव्हेंबर रोजी रंगणार ‘मालवणी अभिमान मेळा’

शेअर करा

आमदार प्रमोद जठार यजमानी ; ‘जय थय मालवणी’ संस्थेचा पुढाकार

सिंधुदुर्ग,दि.०६ सप्टेंबर

छत्रपती शिवाजी महाराजांनी २५ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी केली. याच दिवसाचे औचित्य साधून ‘मालवणी अभिमान दिवस’ म्हणून साजरा करण्याची संकल्पना मुंबईस्थित ‘जय थय मालवणी’ संस्थेने पुढे आणली आहे. या उपक्रमांतर्गत यंदा प्रथमच २५ नोव्हेंबर रोजी मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे ‘मालवणी अभिमान मेळा’ आयोजित करण्यात येणार आहे. या मेळ्याचे यजमानी म्हणून आमदार प्रमोद जठार यांची निवड करण्यात आल्याची माहिती ‘जय थय मालवणी’ संस्थेच्यावतीने पदाधिका-यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे ‘जय थय मालवणी’ संस्थेच्यावतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी आमदार प्रमोद जठार, संस्थेचे जयेंद्र साळगावकर, भाऊ कोरगावकर, ज्येष्ठ पत्रकार रजनीश राणे, संजीव शिरसाट उपस्थित होते. यावेळी ‘मालवणी अभिमान मेळा’च्या बोधचिन्हाचे अनावरणही आ. प्रमोद जठार यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच टीशर्ट वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.

आ. प्रमोद जठार म्हणाले, प्रत्येक मालवणी माणसाचा मेळा ‘मालवणी अभिमान मेळा’ हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नसून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेर राहणाऱ्या सर्व मालवणी बांधवांना एकत्र आणणारा उपक्रम आहे. सिंधुदुर्गातील तसेच जिल्ह्याबाहेरील सर्व राजकीय नेते, कार्यकर्ते, मंत्री, आमदार, खासदार, नगरसेवक, पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मेळ्यात सहभागी व्हावे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , सुनेत्रा पवार , खा. नारायण राणे , सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. मालवणी अस्मिता, संस्कृती आणि परंपरेचा गौरव करणारा हा मेळा भव्य स्वरूपात आयोजित करण्यात येणार आहे.

ज्येष्ठ कर्तृत्ववान व्यक्तींचा होणार गौरव
या मालवणी मेळ्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मालवणी व्यक्तिमत्त्वांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे. एका ज्येष्ठ कर्तृत्ववान मालवणी व्यक्तीला ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, विविध क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी केलेल्या आणखी दोन मालवणी व्यक्तींना ‘मालवणी अभिमान’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असे पत्रकार रजनीश राणे यांनी सांगितले.

दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम

२५ नोव्हेंबर हा दिवस सिंधुदुर्ग किल्ल्याच्या पायाभरणीच्या शुभारंभाचा दिवस आहे. त्यामुळे मालवणी भाषेचा प्रसार व आत्मसन्मान दिवसभर विविध मालवणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहेत. सिंधुदुर्गातील तब्बल ७० कलाकार या मेळ्यात आपली लोककला सादर करणार आहेत. मेळ्याच्या प्रारंभी सिंधुदुर्ग किल्ल्यावरील पवित्र माती, पाणी आणि तटबंदीचा चिरा यांची जल्लोषात पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तसेच सिंधुदुर्गातील रिल्स स्टार्सचा धमाल कार्यक्रम, ‘सिंधुदुर्ग विकास’ विषयावर चर्चासत्र, परिसंवाद, कवी गुरू ठाकूर यांची मुलाखत आणि मालवणी कवी संमेलन असे विविध कार्यक्रम होणार असल्याचे जयेंद्र साळगांवकर यांनी सांगितले.

‘मालवणी रत्न’ आणि छायाचित्र प्रदर्शन
मेळ्यात दोन दालने उभारण्यात येणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तब्बल १३० महान व्यक्तींचा प्रवास ‘मालवणी रत्न’ या नावाने मांडण्यात येणार आहे. याशिवाय ‘ह्या बगलास काय म्हणता!’ या विषयावरील छायाचित्र प्रदर्शनही आयोजित करण्यात येणार आहे. महेश केळुसकर यांनी लिहिलेल्या आणि ‘स्वर्गापेक्षा सुंदर असा’ फेम श्रीकृष्ण सावंत यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘मालवणी अभिमान गीताचे’ प्रकाशनही या मेळ्यात होणार आहे. एकदिवसीय या भव्य मेळ्याचा समारोप मालवणी नाटकाने होणार आहे. सिंधुदुर्गची समृद्ध संस्कृती, कला, परंपरा आणि कर्तृत्वाची ओळख मुंबईत नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्याबरोबरच मालवणी माणसांना एका व्यासपीठावर आणण्याचा हा उपक्रम ठरणार असल्याचे भाऊ कोरगांवकर व संस्थेच्या पदाधिका-यांनी सांगितले.

शेअर करा