Sindhudurg News:प्रधानमंत्री पीक विमा योजनेत रब्बी हंगाम 2026-27 साठी शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि.०३ नोव्हेंबर

नैसर्गिक आपत्ती, प्रतिकूल हवामान तसेच अन्य कारणांमुळे पिकांच्या उत्पादनात घट झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने राज्यात सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2026 व रब्बी हंगाम 2026-27 या वर्षासाठी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक निश्चित करून ही योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.
रब्बी हंगाम 2026-27 मध्ये गहू (बागायत), रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी मका, उन्हाळी भात, उन्हाळी भुईमूग आणि रब्बी कांदा या सात पिकांचा योजनेत समावेश आहे. संबंधित अधिसूचित महसूल मंडळ अथवा क्षेत्रातील पात्र शेतकऱ्यांना या पिकांसाठी विमा संरक्षण घेता येईल.
पिकनिहाय अर्जाची अंतिम मुदत
• रब्बी ज्वारी (बागायत व जिरायत) – 30 नोव्हेंबर 2026.
• गहू (बागायत), हरभरा, रब्बी मका व रब्बी कांदा – 15 डिसेंबर 2026.
• उन्हाळी भात व उन्हाळी भुईमूग – 31 मार्च 2027.
या योजनेत कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होणे ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास, नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या किमान सात दिवस आधी संबंधित कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेला लेखी कळविणे आवश्यक आहे.
अर्ज नोंदणीची प्रक्रिया
शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या https://pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर स्वतः नोंदणी करता येईल. तसेच बँक, विमा कंपनीने नियुक्त केलेले प्रतिनिधी, क्रॉप इन्शुरन्स ॲप आणि सामायिक सुविधा केंद्र (CSC) यांच्या माध्यमातूनही योजनेत सहभागी होता येईल. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व माहिती अचूक भरावी.
सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी नियुक्त विमा कंपनी
राज्य शासनाने निश्चित केलेल्या विमा समूह रचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समूह क्रमांक ५ मध्ये समावेश असून, या समूहासाठी इफ्को टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, नववा मजला, ऑफिस ए, नेक्सस वेस्टेंड, सेक्टर १, बिल्डिंग ए, सर्व्हे क्र. 169/1, परिहार चौकाजवळ, डी.पी. रोड, औंध, पुणे – 411 007. ई-मेल : [email protected] या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
योजनेच्या अटी व शर्ती, अधिसूचित पिके व क्षेत्र आणि अर्ज प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी अथवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
राज्यात सन 2026-27 मध्ये एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेली दुष्काळसदृश परिस्थिती लक्षात घेता, पिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी आर्थिक संरक्षण मिळविण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत वेळेत सहभागी व्हावे. अंतिम मुदतीची वाट न पाहता अधिसूचित पिकांसाठी विमा नोंदणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

शेअर करा