गडनदीच्या पात्रात पाणीसाठा झाल्याने नागरिकांनी व्यक्त केले समाधान ; जलसंधारणाला मिळाली चालना
कणकवली,दि.०३ नोव्हेंबर
जिल्ह्यात निर्माण झालेली संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा साठा निर्माण करण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील कणकनगर येथील केटी बंधाऱ्यात लोखंडी प्लेटा बसविण्यात आल्याने नदीतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. प्लेटा बसविल्यानंतर बंधाऱ्यात पाणी तुडुंब साठल्याचे मनमोहक दृष्य दिसत आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

गडनदी ही कणकवली शहरासाठी महत्त्वाचा जलस्रोत आहे. पावसाळ्यात नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून समुद्राला मिळते. हे पाणी योग्य ठिकाणी अडवून त्याचा साठा निर्माण केल्यास भविष्यात पाणीटंचाईच्या काळात त्याचा फायदा होऊ शकतो. याच उद्देशाने कणकनगर येथील केटी बंधाऱ्यांमध्ये लोखंडी प्लेटा बसविण्याची आवश्यकता होती. त्यानंतर पाणी अडवण्यासाठी बंधाऱ्यावर प्लेटा टाकण्यात आल्या. पाणीसाठा निर्माण झाल्याने जलसंधारणाच्या दृष्टीने ही बाब महत्त्वपूर्ण ठरत आहे.नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने परिसरातील भूजल पातळी वाढण्यास मदत होणार आहे. लगतधारक असलेल्या नागरिकांच्या विहिरी व पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे.
.