Malvan News : मालवणात १९ व २० डिसेंबरला ‘सिंधुदुर्ग ओशन स्विमथॉन’ स्पर्धेचे आयोजन

शेअर करा

चिवला बीचवर रंगणार जलतरणचा थरार

मालवण,दि.०३ नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगर परिषद यांच्या संयुक्त विद्य‌माने प्रतिष्ठित अशी सोळावी सिंधुदुर्ग ओशन स्विमथॉन २०२६ ही स्पर्धा चिवला बीच, मालवण येथे दि. १९ आणि २० डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशनतर्फे दि. १९ डिसेंबर रोजी चौथी १० कि.मी. ओपन सी स्विमिंग रेस व चौथी ओपन वॉटर फिनस्विमिंग चॅम्पियनशिप (१० कि.मी., १ कि.मी. फिनस्विमिंग व २ कि.मी. फिनस्विमिंग स्पर्धा देखील आयोजित केली जाणार आहे, या स्पर्धेत सुमारे १२०० स्पर्धक सहभागी होणार आहेत, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालवण नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जलतरण स्पर्धेची माहिती देण्यात आली. यावेळी
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण उर्फ दीपक परब, महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे व सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे सचिव राजेंद्र पालकर, मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर, नगरसेवक ललित चव्हाण, पर्यटन व्यावसायिक गुरुनाथ राणे, मच्छिमार नेते बाबी जोगी, निल लब्दे, विक्रांत नाईक फ्रान्सीस फर्नांडीस, मनोज मेतर आदी वं इतर उपस्थित होते.

मालवणच्या चिवला बीचवर २००९ पासून सागरी जलतरण स्पर्धा होत असून यंदा या स्पर्धेचे १६ वे वर्ष आहे. देशातील ही एक सर्वात मोठी जलतरण स्पर्धा आहे. या स्पर्धेत गेल्या पंधरा वर्षात सुमारे २०,००० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. यंदा ८ राज्ये व ३० जिल्ह्यांतून जलतरणपटू या सर्वात मोठ्या सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ८ ते ८५ वर्षे वयोगटातील अंदाजे १००० ते १२०० स्पर्धक १२ विविध वयोगटांत भाग घेणार असून, आजी-आजोबा, आई-वडील व मुले अशा तीन पिढ्या एकत्र समुद्रात पोहताना पहायला मिळणार आहेत, असे यावेळी दीपक परब यांनी सांगितले.

दि. १८ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता दोन्ही स्पर्धांचा संयुक्त उद्घाटन समारंभ होणार असून २० डिसेंबर रोजी सकाळी ६.०० वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. स्पर्धेनंतर पदक व पारितोषिक वितरण समारंभ दुपारी २.३० वाजता चिवला बीच, मालवण येथे पार पडेल. या कार्यक्रमासाठी विविध मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे, असेही दीपक परब यांनी सांगितले.

संपूर्ण भारतात मतिमंद, दिव्यांग व अंध जलतरणपटूंना समुद्रात पोहण्याची संधी देणारी ही एकमेव स्पर्धा आहे. दरवर्षी त्यांच्यासाठी स्वतंत्र गटांचे आयोजन करण्यात येते. तसेच यंदाची ही स्पर्धा खेलो इंडिया बीच गेम्स (ओपन वॉटर स्विमिंग) साठी पात्रता फेरी असणार आहे, असे राजेंद्र पालकर यांनी सांगितले.

या स्पर्धेसाठी नावनोंदणी सुरु आहे. या स्पर्धेत स्थानिक जलतरण स्पर्धकांना देखील सहभागी होता येणार आहे, यासाठी त्यांना प्रवेश शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येणार असून त्यांनी नोंदणी प्रक्रिया आवश्यक कागदपत्रे व अटी नियम यांचे पालन करून पूर्ण केली पाहिजे, असे राजेंद्र पालकर यांनी सांगितले.

या स्पर्धेत स्पर्धकांचा उत्साह वाढविण्याकरिता त्यांच्यासोबत त्यांचे पालक, कुटुंबीय तसेच मित्रपरिवार असे २००० हून अधिक लोक उपस्थित राहणार आहेत. स्पर्धे दरम्यान मनोरंजनासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही होणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने मालवणसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील क्रीडा प्रचार आणि प्रसार होऊन पर्यटनालाही चालना मिळण्यास मदत होणार आहे. या स्पर्धेसाठी मालवण नगरपालिकेचे सहकार्य लाभत असून येथील स्थानिक पर्यटन व्यावसायिक, मच्छिमार, व्यापारी व नागरिकांनी देखील या स्पर्धेला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी राजेंद्र पालकर व दीपक परब यांनी केले.

या स्पर्धेची नोंदणी महाराष्ट्र अॅक्वाटिक असोसिएशनच्या https://maharashtraaquaticassociation.com/events/16th-sindhudurg-ocean-swimathon/ या संकेतस्थळावर सुरु आहे. स्पर्धेसंबंधी नोंदणी, कोणत्याही शंका किंवा अडचणींसाठी समिती सदस्य बाबा परब – ९४२०७३८३८२, डॉ. वालावलकर ९४२२९ ६७८७८, नील लब्दे- ९६६५३६१७३६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

शेअर करा