Kankavli News : स्थानिक बाजारपेठेला ताकद देणारा दिवाळी बाजार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देईल

शेअर करा

पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास; भाजप आयोजित दिवाळी बाजाराचे उत्साहात उद्घाटन

कणकवली,दि.०३ नोव्हेंबर

सिंधुदुर्ग जिल्हा सध्या दुष्काळाच्या संकटाचा सामना करत असून ट्रिगर वनमध्ये समाविष्ट आहे. अशा परिस्थितीत स्थानिक बाजारपेठेला बळ देणाऱ्या उपक्रमांचे महत्त्व अधिक वाढले आहे. दिवाळी बाजारात होणारा प्रत्येक व्यवहार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा आहे. स्थानिक विक्रेते, व्यावसायिक आणि बचत गटांतील महिलांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणारा भाजपचा दिवाळी बाजार आगामी काळात जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला आधार देणारा ठरेल, असा विश्वास राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केला.

भारतीय जनता पार्टी, कणकवलीच्या वतीने आयोजित दिवाळी बाजाराचे उद्घाटन ना. नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या उद्घाटन सोहळ्याला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, नगरसेविका मेघा गांगण, सुप्रिया नलावडे, प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत, मनस्वी ठाणेकर, आर्या राणे, गणेश ऊर्फ बंडू हर्णे, संजय कामतेकर, राकेश राणे, स्वप्निल ऊर्फ दादू राणे, माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, बंडू गांगण, सागर राणे, पप्पू पुजारे, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे, गौतम खुडकर, समीर प्रभुगावकर, अभिषेक नाडकर्णी, लक्ष्मण घाडीगांवकर, अभय राणे, रंजन राणे, अमोल रासम, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया मेस्त्री, सुप्रिया पाटील, शीतल दळवी आदी उपस्थित होते.

कणकवली शहरातील पेट्रोल पंपासमोरील फ्लायओव्हर ब्रिजखाली या दिवाळी बाजाराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने या उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. यामध्ये आकाशकंदील, मातीच्या पणत्या, हस्तकलेच्या वस्तू, हाताने विणलेल्या वस्तू तसेच विविध प्रकारचा दिवाळी फराळ विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. नागरिकांना दिवाळी खरेदीसाठी एकाच ठिकाणी विविध वस्तू मिळत असून स्थानिक विक्रेते आणि बचत गटांतील महिलांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ मिळाले आहे.

यावेळी बोलताना ना. नितेश राणे म्हणाले की, भाजपचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि पक्षातील सहकाऱ्यांनी एकत्र येऊन या उपक्रमाची सुरुवात केली. आठ वर्षांपूर्वी सुरू झालेला हा उपक्रम आज मोठ्या स्वरूपात विस्तारला आहे. कणकवलीकर दरवर्षी या दिवाळी बाजाराची आतुरतेने वाट पाहतात. बचत गटांतील महिला अनेक महिन्यांपासून मेहनत घेऊन विविध वस्तू तयार करतात. त्यांच्या मेहनतीतून तयार झालेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळत असून महिलांना आर्थिक स्वावलंबनाची संधी उपलब्ध होत आहे.

प्रत्येक सिंधुदुर्गवासीयाने स्थानिक बाजारपेठेला ताकद देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. स्थानिक बाजारपेठेत होणारा प्रत्येक व्यवहार जिल्ह्याच्या अर्थकारणाला चालना देणारा आहे. त्यामुळे स्थानिक व्यापारी, व्यावसायिक आणि महिला बचत गटांकडून नागरिकांनी खरेदी करावी. अशा उपक्रमांसाठी मेहनत घेणाऱ्या भाजपच्या महिला कार्यकर्त्या, शहरातील पदाधिकारी आणि सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.

भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कणकवलीतील प्रत्येक व्यावसायिक भगिनीने व्यवसायाचे लायसन्स घेऊन या दिवाळी बाजारात सहभाग घेतल्याचे सांगितले. महिलांनी व्यवसायाच्या माध्यमातून पुढे यावे, या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर म्हणाल्या की, एका लक्ष्मीने दुसऱ्या लक्ष्मीला दिलेला हा आधार आहे. महिलांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून महिलांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार करावा. नागरिकांनी स्थानिक व्यापाऱ्यांकडून खरेदी करून त्यांचे हात बळकट करावेत, असे आवाहन त्यांनी केले.

शेअर करा