नगराध्यक्षा श्रद्धाराजेंनी केलं उद्घाटन
सावंतवाडी,दि.०३ नोव्हेंबर
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्यावतीने विशेष दिवाळी साहित्य विक्री स्टॉलचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमातून स्थानिक महिला बचतगटांनी तयार केलेल्या विविध वस्तू ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले.
या स्टॉलमध्ये घरगुती फराळाचे पदार्थ, आकर्षक आकाशकंदील, पणत्या, कोकणी मेवा तसेच दिवाळीसाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तूंचा समावेश आहे. महिलांनी स्वतःच्या मेहनतीतून आणि कल्पकतेतून तयार केलेल्या या वस्तूंना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या उपक्रमामुळे महिला बचतगटांना आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळत असून त्यांच्या आर्थिक स्वावलंबनालाही प्रोत्साहन मिळत आहे. नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित हे विक्री स्टॉल २ ते ६ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सावंतवाडीकरांनी या स्टॉलला भेट देऊन महिला बचतगटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन या उपक्रमाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, सभापती दिपाली भालेकर, सुनिता पेडणेकर, दुलारी रांगणेकर, शर्वरी धारगळकर, स्नेहा नाईक, सुकन्या टोपले आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
