२४ वर्षांचा वित्तीय क्षेत्रातील अनुभव; कामराजार बंदराच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदाचीही सांभाळली जबाबदारी
सिंधुदुर्ग,दि.२८ ऑक्टोंबर
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संचालक (वित्त) पदी श्रीमती कविता राकेश सातवी यांनी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी पदभार स्वीकारला. वित्त, लेखा आणि व्यावसायिक कामकाज या क्षेत्रांतील तब्बल २४ वर्षांच्या अनुभवाच्या जोरावर त्यांची या महत्त्वपूर्ण पदावर नियुक्ती झाली आहे.
कविता सातवी या सनदी लेखापाल (CA) असून त्यांनी पहिल्याच प्रयत्नात सीएची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. त्यानंतर त्यांनी ऑस्ट्रेलियातील डीकिन विद्यापीठातून ग्लोबल बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. तसेच एसीसीए, यूकेकडून आंतरराष्ट्रीय वित्तीय अहवाल प्रणालीतील डिप्लोमाही त्यांनी पूर्ण केला आहे.
कोकण रेल्वेत संचालकपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्या चेन्नई येथील कामराजार पोर्ट लिमिटेडमध्ये मुख्य वित्तीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. या पदावर असताना त्यांनी ४५० कोटी रुपयांच्या भांडवली गाळ उपसा प्रकल्पासाठी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाची मंजुरी मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच कंपनीच्या आर्थिक नियोजनासह प्राप्तिकराशी संबंधित प्रलंबित बाबींच्या निराकरणासाठी आणि निधी व्यवस्थापनासाठी त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले. कंपनीच्या १,२०० कोटी रुपयांच्या प्रारंभिक सार्वजनिक समभाग विक्री (IPO) प्रक्रियेची जबाबदारीही त्यांनी सांभाळली.
यापूर्वी त्यांनी जे. एम. बक्षी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स लिमिटेड येथे उपाध्यक्ष (वित्त), एपीएम टर्मिनल्स येथे सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त), भारत मुंबई कंटेनर टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेड येथे व्यवस्थापक (वित्त), तसेच कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि कॉन्कोर एअर लिमिटेड येथे वित्त विभागाच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
वित्तीय अहवाल, आर्थिक नियोजन, अर्थसंकल्प, निधी व्यवस्थापन, करप्रणाली, लेखापरीक्षण, जोखीम व्यवस्थापन, करार व्यवस्थापन आणि संस्थात्मक प्रशासन अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांना व्यापक अनुभव आहे. आर्थिक प्रक्रियांमध्ये सुधारणा, नवीन प्रणालींची अंमलबजावणी आणि धोरणात्मक निर्णयप्रक्रियेतही त्यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे.
कविता राकेश सातवी यांच्या नियुक्तीमुळे कोकण रेल्वेच्या आर्थिक व्यवस्थापनाला त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.