Sindhudurg News:ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी 13 नोव्हेंबरपर्यंत ऑफलाईन अर्ज करण्याची मुदत

शेअर करा

सन २०२६-२७ शैक्षणिक वर्षासाठी OBC, VJNT व SBC प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ; धनगर समाजातील विद्यार्थ्यांचा समावेश नाही

सिंधुदुर्ग,दि.०३ नोव्हेंबर

सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर मागासवर्ग (OBC), विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT) तसेच विशेष मागास प्रवर्ग (SBC) या प्रवर्गांतील उच्च शिक्षण घेणाऱ्या, मात्र शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना’ राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेत भटक्या जमाती (क) प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा समावेश नाही.
या योजनेंतर्गत बारावीनंतर पदवी, पदव्युत्तर तसेच व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यमान (Existing) पात्र विद्यार्थ्यांना सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी लाभ घेता येणार आहे. ऑनलाईन पोर्टल सुरळीत होईपर्यंत विद्यार्थ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 13 नोव्हेंबर 2026 पर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
इच्छुक पात्र विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑफलाईन पद्धतीने सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, सिंधुदुर्ग कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग येथे मुदतीत जमा करावेत.
जिल्ह्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी विहित मुदतीत अर्ज सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहायक संचालक उदयसिंह गायकवाड यांनी केले आहे.

शेअर करा