सिंधुदुर्ग,दि.०३ नोव्हेंबर
जिल्ह्यातील केळी, नारळ व सुपारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजनेअंतर्गत (RWBCIS) विमा अर्ज करण्यास आणि विमा हप्ता भरण्यास १५ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राष्ट्रीय पीक विमा पोर्टल (NCIP) उशिराने कार्यान्वित झाल्यामुळे रब्बी हंगाम २०२६-२७ च्या प्रारंभी शेतकऱ्यांची नोंदणी कमी प्रमाणात झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने शेतकरी हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
या मुदतवाढीचा लाभ जिल्ह्यातील केळी, नारळ व सुपारी उत्पादक कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना घेता येणार आहे. योजनेची सिंधुदुर्ग जिल्ह्यात अंमलबजावणी करण्यासाठी ॲग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा नोंदणी केली नसल्यास या वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा. १५ नोव्हेंबर २०२६ पूर्वी जवळच्या ग्राहक सेवा केंद्राच्या किंवा अधिकृत पीक विमा पोर्टलवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून विमा अर्ज व विमा हप्ता भरण्याची कार्यवाही करावी. कोणताही पात्र शेतकरी पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभागामार्फत संबंधित यंत्रणा व नोंदणी केंद्रांनी योजनेची व्यापक जनजागृती करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.