सिंधुदुर्ग : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीचा निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी घेतला आढावा

शेअर करा

सिंधुदुर्ग,दि. ०७ जुलै

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार (दि ०६) रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक संपन्न झाली. 
या बैठकीला जिल्हा उपनिबंधक प्रदीप मालगावे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयप्रकाश परब, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत,  लीड बँक मॅनेजर श्री. गावडे, तसेच विविध बँकांचे समन्वयक आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भातील विविध बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती, एकवेळ समझोता (One Time Settlement) तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याबाबत शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना देण्यात आली.
 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळावा, यासाठी सर्व बँकांनी आवश्यक पूर्वतयारी पूर्ण ठेवावी. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांच्या प्रोत्साहनपर लाभाच्या याद्या अद्ययावत ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हा उपनिबंधक श्री. मालगावे यांनी संबंधित बँकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी बँकांनी आवश्यक कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे सांगताना श्री. मालगावे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जवसुलीचे प्रमाण समाधानकारक असल्याचे नमूद केले. त्यामुळे प्रोत्साहनपर लाभासाठी पात्र शेतकऱ्यांच्या याद्या तयार ठेवाव्यात. शासनाकडून मागणी होताच त्या तत्काळ सादर करता येतील, यासाठी आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
बैठकीत शासकीय कर्मचाऱ्यांच्या माहिती अद्ययावतीकरणाच्या कामाचाही आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची माहिती प्रणालीवर अपलोड करण्यात आली असून पंचायत समिती, नगरपालिका व नगरपरिषदांतील कर्मचाऱ्यांची माहितीही पूर्णपणे भरून झाल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. ही माहिती सेवार्थ व शालार्थ प्रणालीद्वारे प्राप्त झाल्याचे यावेळी सांगण्यात आले.

शेअर करा