जिल्हा बँक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त केला विश्वास; बँकेच्या सभासदांना १३.५ टक्के लाभांश जाहीर
सिंधुदुर्ग,दि.०१ जुलै
दुग्ध, मत्स्य, नागरी पतसंस्था, महिला उद्योग, प्रक्रिया उद्योग, शैक्षणिक कर्ज, विद्यार्थ्यांची बचत, कुपोषण निर्मूलन अशा विविध क्षेत्रांत बँकेने सामाजिक व आर्थिक उपक्रम राबवत बॅंक प्रगतीपथावर काम करत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे दोन वर्षांत १० हजार कोटींच्या व्यवसायाचे लक्ष ठेवण्यात आले आहे. गावच्या विकास संस्थांच्या सक्षमीकरणासाठी आणि शेतक-यांच्या हितासाठी विविध योजना बॅंकेने आणले आहेत. सहकाराच्या माध्यमातून प्रत्येक गाव आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त करत, “ही जिल्हा बँक शेतकऱ्यांची आणि सभासदांची असून तिचा नावलौकिक राज्य व देशभर वाढविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे,” असे आवाहन बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. तसेच सभासदांसाठी १३.५ टक्के लाभांश आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी २० टक्के बोनस त्यांनी जाहीर केला.
सिंधुदुर्ग नगरी येथील शरद कृषी भवन येथे सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी बोलत होते , यावेळी व्यासपीठावर बॅंक उपाध्यक्ष अतुल काळसेकर , संचालक प्रकाश बोडक, विठ्ठ्ल देसाई , गणपत देसाई, विद्याप्रसाद बांदेकर , विद्याधर परब , संदीप परब , दिलीप रावराणे , सुशांत नाईक,महेश सारंग , समीर सावंत , प्रज्ञा ढवण , आत्माराम ओटवणेकर , मेघनाथ धुरी , रवींद्र मडगांवकर, गजानन गावडे ,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, प्रकाश मोरये , व्हिक्टर डान्टस, सुनील फणसेकर , देवेंद्र धुरी आदींसह संचालक व जिल्हा बॅंकेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेनुसार विविध मुद्दांवर सभासदांनी चर्चा केली. बॅंकेच्या सभासदांनी विविध निर्णयाबद्दल व बॅंकेच्या प्रगतीबद्दल अभिनंदनाचे ठराव मंजूर करण्यात आले.तसेच काही सभासदांनी बॅंकेच्या कामकाजाबद्दल विविध सुचना केल्या. त्यावर सकारात्मक चर्चा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी करत सभासदांचे समाधान केले.

बॅंक अध्यक्ष मनीष दळवी बँकेच्या प्रगतीचा आढावा घेत आगामी वाटचालीची दिशा स्पष्ट केली. बँकेचा एकूण व्यवसाय ७,१७६ कोटी रुपयांवर पोहोचल्याचे सांगत, पुढील दोन वर्षांत १० हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा गाठण्याचा निर्धार केला आहे. यावेळी बँकेच्या वाटचालीत मोलाचे योगदान देणारे दिवंगत सहकार नेते केशवराव राणे, डी. वी. ढोलम, शिवरामभाऊ जाधव यांच्यासह सर्व ज्येष्ठ सहकार नेत्यांना अभिवादन करण्यात आले. तसेच माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने राज्यातील जिल्हा बँकांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी सर्वप्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याचा मान मिळवल्याचे त्यांनी सांगितले.
३१ मार्च २०२६ अखेरच्या आर्थिक आकडेवारीनुसार बँकेचे भागभांडवल ५८.२० कोटी, एकूण निधी ६३३.६४ कोटी, एकूण ठेवी ३,९४२.५७ कोटी, तर एकूण कर्ज ३,२३३.६४ कोटी इतके आहे. बँकेचा ढोबळ नफा १४९.४३ कोटी, तर निव्वळ नफा ५० कोटी बँकेला झाला आहे.बँकेचा ग्रॉस एनपीए ३.४५ टक्के, नेट एनपीए शून्य टक्के आहे. डिसेंबर २०२१ मध्ये ४,२७७ कोटी असलेला व्यवसाय मार्च २०२२ मध्ये ४,४५७ कोटी, मार्च २०२३ मध्ये ४,८३८ कोटी, मार्च २०२४ मध्ये ५,३९० कोटी, मार्च २०२५ मध्ये ६,०९४ कोटी आणि आता मार्च २०२६ मध्ये ७,१७६ कोटींवर पोहोचला आहे. पुढील 2 वर्षात 10 कोटी रुपये व्यावसायाचे उद्दिष्ट ठेवून आम्ही काम करत आहोत. यंदाही ‘अ’ ऑडिट वर्ग कायम राखण्यात यश आल्याचे बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी सांगितले.
विकास संस्थांना बळकटी देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय –
प्राथमिक विकास सहकारी संस्थांचे संगणकीकरण, पारदर्शक कारभार आणि शेतकऱ्यांना जलद कर्जवितरणासाठी बँकेने राज्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. विकास संस्थांमार्फत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना थेट बँकेपेक्षा एक टक्का कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे कन्झेक्शन कर्ज विकास संस्थांमार्फत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विकास संस्थांसाठी गोदाम उभारणीसाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज, प्रक्रिया उद्योगांना प्रोत्साहन, तसेच महिलांच्या बचत गटांना १० लाख रुपयांपर्यंत विनातारण कर्ज देण्याची योजना राबविण्यात येणार असल्याची घोषणा बॅंक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केली.
आंबा-काजू उत्पादकांना दिलासा –
आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी दोन टक्के व्याज सवलतीची घोषणा प्रत्यक्षात आणत १० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात २ कोटी ४ लाख रुपये जमा करण्यात येणार आहे. तसेच आंबा-काजू बागायतदारांसाठी वाढीव कर्जासाठी ३० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.बँकेतील ७३ पदांची भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच नियुक्त्या केल्या जातील. त्याचबरोबर आणखी ६७ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.ग्राहकांना अधिक गतिमान सेवा देण्यासाठी टीसीएसच्या अत्याधुनिक सीबीएस प्रणालीची अंमलबजावणी सुरू करण्यात आली असून भविष्यात गावातील विकाससंस्थांमध्ये शेतकऱ्यांचा मोबाईलवरून कर्जाचा अर्ज मंजुरीपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे मनीष दळवी यांनी सांगितले.