बीएलओची घरभेट, ऑनलाईन सुविधा आणि दावे-हरकती प्रक्रिया घरबसल्या पूर्ण करता येणार
सिंधुदुर्ग,दि.२७ जून
भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगामी ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहीम राबविण्यात येणार असून या मोहिमेचे वेळापत्रक प्रशासनाने जाहीर केले आहे. विशेष म्हणजे मुंबईसह इतर शहरांमध्ये नोकरी, व्यवसाय किंवा शिक्षणासाठी वास्तव्यास असलेल्या चाकरमान्यांना या मोहिमेमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. मतदार यादीतील नावांची पडताळणी, दुरुस्ती अथवा अन्य प्रक्रियांसाठी पावसाळ्यात खास गावी येण्याची आवश्यकता नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदार यादी अधिक अचूक व अद्ययावत करण्यासाठी ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) घरोघरी भेट देणार आहेत. या काळात संबंधित मतदार गावात उपस्थित नसला तरी त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा नातेवाईक आवश्यक माहिती देऊ शकतील तसेच गणना प्रपत्रावर स्वाक्षरीही करू शकतील. त्यामुळे चाकरमान्यांना केवळ या कामासाठी प्रवास करण्याची गरज भासणार नाही.
प्रशासनाने या मोहिमेत डिजिटल सुविधांवर विशेष भर दिला आहे. ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मतदारांना निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच ‘व्होटर हेल्पलाईन’ आणि ‘ईसीआयनेट’ मोबाईल ॲपच्या माध्यमातून घरबसल्या आपले नाव तपासता येणार आहे.
मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, दुरुस्ती करणे किंवा हरकत नोंदविणे आवश्यक असल्यास ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने दावे व हरकती दाखल करता येणार आहेत. यामुळे जिल्ह्याबाहेर वास्तव्यास असलेल्या मतदारांनाही ही प्रक्रिया सहज पूर्ण करता येणार आहे.
याशिवाय विविध राजकीय पक्षांचे अधिकृत मतदान केंद्र प्रतिनिधी (बीएलए) आणि स्थानिक नागरिक यांच्या सहकार्याने मतदार पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. त्यामुळे चाकरमान्यांच्या नावांची अचूक नोंद सुनिश्चित करण्यास मदत होणार आहे.
निवडणूक आयोगाची ही मोहीम लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधारित असल्याने मतदारांनी डिजिटल सुविधांचा लाभ घेऊन या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुनरीक्षण कार्यक्रमाचे वेळापत्रक
३० जून ते २९ जुलै २०२६ – बीएलओ यांची घरोघरी भेट मोहीम
५ ऑगस्ट २०२६ – प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध
५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ – दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी
५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर २०२६ – प्राप्त दावे व हरकतींवर निर्णय प्रक्रिया
७ ऑक्टोबर २०२६ – अंतिम मतदार यादी प्रसिद्ध.