तळेरे,दि. ०९ जून,
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राजधानी रायगडावर जसा भव्य सोहळा जल्लोषात पार पडला, त्याच उत्साहात कणकवली तालुक्यातील तळेरे येथे मेरा युवा भारत,सिंधुदुर्ग, सिंधू फाउंडेशन आणि प्रज्ञांगण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रावणी कॉम्प्युटरस या ठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला दैनिक सागरचे वार्ताहर अंकित घाडीगावकर, श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, संचालिका श्रावणी मदभावे, माजी विद्यार्थी तसेच विद्यमान विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी श्रावणी कॉम्प्युटरच्या संचालिका श्रावणी मदभावे यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे ऐतिहासिक महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यानंतर दैनिक सागरचे वार्ताहर अंकित घाडीगावकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पर्यावरणाचा बिघडलेला समतोल पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी युवा पिढीने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली. प्रत्येकाने दरवर्षी किमान पाच झाडे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि शिकवण आपल्या आचार-विचारांत रुजविण्याची आवश्यकता अधोरेखित करत, “शिवरायांचे केवळ अनुकरण नव्हे तर त्यांच्या विचारांवर चालणे महत्त्वाचे आहे. युवा वर्गाने शिवरायांच्या आदर्शांचा स्वीकार केला तर भारत अधिक सुरक्षित, सक्षम आणि प्रगतशील राष्ट्र बनेल,” असे प्रतिपादन त्यांनी केले.
शिवराज्याभिषेक सोहळ्यासोबतच ५ जून रोजी झालेल्या जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षारोपण आणि सामाजिक जबाबदारी याविषयी आपले विचार व्यक्त केले. युवा वर्ग पर्यावरण संतुलनासाठी कोणत्या प्रकारे योगदान देऊ शकतो, यावरही विद्यार्थ्यांनी प्रभावी मते मांडली.
कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी वृक्षतोड, व्यसनाधीन होत चाललेली युवा पिढी आणि त्यातून निर्माण होणारे सामाजिक व पर्यावरणीय दुष्परिणाम यांवर आधारित पथनाट्य सादर केले. या पथनाट्याद्वारे उपस्थितांना सामाजिक संदेश देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे शिवराज्याभिषेक सोहळा आणि पर्यावरण जनजागृतीचा संदेश देणारा हा कार्यक्रम संस्मरणीय ठरला