तळेरे ,दि. ०९ जून
स्व.सुनील तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट व वाचनालय, तळेरे यांच्यावतीने तळेरे पंचक्रोशीतील दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी तळेरे ग्रामपंचायत सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच हनुमंत तळेकर होते, तर सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी जयप्रकाश परब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी माजी सभापती तथा भाजप कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर, व्यापारी संघटना तळेरेचे अध्यक्ष राजू जठार, वाचनालयाचे अध्यक्ष राजू वळंजू, वाचनालयाचे उपाध्यक्ष शशांक तळेकर, ट्रस्टचे उपाध्यक्ष चंद्रकांत तळेकर, निवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाचे अध्यक्ष उदय दुधवडकर, श्रावणी मदभावे, भाई पोकळे, तळेरे महिला व्यापारी संघटनेच्या उपाध्यक्षा रेश्मा तळेकर, सामाजिक कार्यकर्ते रमाकांत राऊत, वाचनालयाचे सचिव मिनेश तळेकर, ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर, नितीन तळेकर, ट्रस्ट व वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व स्वर्गीय सुनील तळेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण परिश्रम घेण्याचा सल्ला दिला. “दहावी व बारावीतील यश हा केवळ प्रवासाचा प्रारंभ आहे. या यशात समाधान न मानता विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणासोबत स्पर्धा परीक्षांची तयारी करून प्रशासकीय सेवांमध्ये स्थान मिळवावे. सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या नेहमीच अव्वल राहिला असला तरी स्पर्धा परीक्षांमध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग अपेक्षेप्रमाणे दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवावे,” असे ते म्हणाले.

आपल्या संघर्षमय जीवनप्रवासातील अनुभव कथन करताना त्यांनी जिद्द, चिकाटी आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित केले. “आज पालक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही कमतरता भासू देत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या संधीचे सोने करून पालकांचा अभिमान वाढवावा,” असे आवाहन त्यांनी केले.

जागतिक पर्यावरण दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पर्यावरण संवर्धन, वृक्षतोड, प्लास्टिकचा वाढता वापर आणि पर्यावरणीय समतोल या विषयांवरही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी माय युवा भारत, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वृक्षतोड, व्यसनाधीनता, किनारपट्टीवरील प्रदूषण आणि मोबाईलच्या अयोग्य वापरावर आधारित प्रभावी पथनाट्य श्रावणी कॉम्प्युटरच्या मुलांनी सादर केले. या पथनाट्याचे त्यांनी विशेष कौतुक केले. समाजातील ज्वलंत प्रश्नांवर जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच “एक पेड़ माँ के नाम” या उपक्रमाचा उल्लेख करत प्रत्येकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
यावेळी निवृत्त पोलीस अधिकारी सूर्यकांत तळेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्या शालेय जीवनातील काही गमतीशीर आठवणी सांगितल्या. “आमच्या काळात पेपरफुटीचे प्रकार नव्हते. शाळेत शिक्षकांनी आणि घरी वडिलांनी केलेल्या शिस्तीमुळेच आम्ही घडलो,” असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा सल्ला दिला.
माजी सभापती तथा भाजप कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष दिलीप तळेकर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना, “आजच्या यशाने हुरळून न जाता स्पर्धा परीक्षांचा मार्ग स्वीकारा. उत्तम शिक्षण घेऊन क्लास वन अधिकारी बनण्याचे ध्येय ठेवा. कोणत्याही प्रकारच्या सहकार्य व मार्गदर्शनासाठी आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत,” असे सांगितले.
या कार्यक्रमात दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्रे व शालेय साहित्य देऊन गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल पालकांचेही अभिनंदन करण्यात आले. या सर्व गुणवंत मुलांसाठी कै. विनय केशव पावसकर यांच्या स्मरणार्थ संतोष परशुराम तळेकर यांनी तसेच डॉ. अभिजित कणसे आणि नितीन तळेकर यांनी शैक्षणिक साहित्यासाठी विशेष सहकार्य केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ट्रस्टचे सचिव निकेत पावसकर यांनी केले तसेच उपस्थित मान्यवर, पालक, विद्यार्थी आणि कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. यावेळी पत्रकार गुरुप्रसाद सावंत, अंकित घाडी, श्रावणी कॉम्प्युटरचे संचालक सतीश मदभावे, ग्रंथपाल सौ.साक्षी तळेकर, सहाय्यक सौ.नेत्रा पावसकर आदी उपस्थित होते.