मुंबईच्या मंडळाकडून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
तळेरे,दि.२७ जून
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासार्डे तांबळवाडीचा ५० वा वर्धापन दिन शनिवार, दिनांक २७ जून रोजी अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात संपन्न झाला. या सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमा दरम्यान मुंबईतील नामांकित मंडळांच्या वतीने शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला शैक्षणिक साहित्यासह दप्तरांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावदेवी व जे.के. बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ तसेच अखिल गावदेवी व जे.के. बिल्डिंग सार्वजनिक श्री शारदोत्सव समिती (गावदेवी, मुंबई) चे अध्यक्ष अनुप गावड उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले. केंद्रप्रमुख नितीन पाटील यांनी मुंबईतील या दोन्ही मंडळांच्या सामाजिक व समाजोपयोगी उपक्रमांचे विशेष कौतुक केले, तसेच ग्रामस्थांना शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट:
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मा. गणेश पाताडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आनंद राणे व चेतन शेट्ये यांच्या माध्यमातून मुंबईच्या गावदेवी व जे.के. बिल्डिंग सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आणि शारदोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला वह्या, स्केच पेन, पेन्सिल, खोडरबर, चित्रकला वही आणि दप्तर (स्कुल बॅग) भेट म्हणून दिले. त्यांच्या या उदात्त सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा परिवाराच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
मान्यवरांची उपस्थिती:
या सोहळ्याला मुंबईच्या मंडळाचे पदाधिकारी अनुप गावड, संजय बागकर, समीर कडलग, कमलाकर चौगुले, विद्याधर कोरगावकर, पांडुरंग बागकर, श्रीकांत माळकर, संदेश वाजे, चंद्रशेखर मयेकर व आनंद राणे उपस्थित होते.
तसेच शाळा सुवर्ण महोत्सवी समितीचे अध्यक्ष विनायक पाताडे, निलेश पाताडे, विजय पाताडे, चंद्रकांत गायकवाड, अंकुश गाडे, जयवंत तोरस्कर, पोलीस पाटील सौ. स्वाती पाताडे, सौ. पूजा पाताडे, सौ. मनस्वी पाताडे, सौ. रेश्मा पवार, सौ. मंजुळा राठोड यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, माजी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानत, आगामी ‘सुवर्ण महोत्सवी सांगता समारंभालाही’ सर्वांनी अशाच उत्साहाने उपस्थित राहावे, असे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कासार्डे तांबळवाडी) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
