तळेरे : आषाढी एकादशी निमित्त उपरण्यावर साकारला विठ्ठल!

शेअर करा

गवाणेतील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांची अनोखी कलाकृती; भक्ती, संस्कृती आणि कलेचा सुंदर संगम

तळेरे,दि.२५ जुलै

आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री यांनी पारंपरिक वारकरी उपरण्यावर भगवान श्री विठ्ठलाचे आकर्षक हस्तचित्र साकारून भक्ती आणि कलेचा अनोखा संगम घडविला आहे. कॅनव्हासऐवजी वारकरी संप्रदायात विशेष महत्त्व असलेल्या उपरण्यावर रंगविण्यात आलेल्या या कलाकृतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. वारकरी परंपरेत उपरणे हे सन्मान, शुद्धता, सेवाभाव आणि भक्तीचे प्रतीक मानले जाते. याच उपरण्यावर श्री विठ्ठलाचे चित्र साकारून आषाढी एकादशीचा आध्यात्मिक संदेश अधिक प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न अक्षय मेस्त्री यांनी केला आहे.

   या कलाकृतीतून "भक्ती, संस्कृती आणि कला" यांचा सुंदर मिलाफ अनुभवायला मिळतो. विशेषतः तरुण पिढीने भारतीय संस्कृती, वारकरी परंपरा आणि पारंपरिक कलेशी जोडले जावे, तसेच आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान जपावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे अक्षय मेस्त्री यांनी सांगितले.

ही कलाकृती ॲक्रेलिक रंगांच्या माध्यमातून साकारण्यात आली असून चित्राची उंची ३ फूट तर रुंदी २.५ फूट आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने साकारलेल्या या आगळ्यावेगळ्या कलाकृतीचे नागरिक आणि वारकरी भाविकांकडून कौतुक होत आहे.

शेअर करा