१४ वर्षांची परंपरा कायम; फोंडाघाटच्या गांगोमाऊली गोविंदा पथकाने फोडली मानाची हंडी
‘परंपरा जपा, संस्कृती पुढे न्या’ – आमदार प्रमोद जठार
तळेरे,दि.०६ सप्टेंबर
सिंधुदुर्गच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक जीवनात आपल्या उत्सवांची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवाने यंदाही कासार्डेमध्ये उत्साहाचा जल्लोष निर्माण केला. गेल्या १४ वर्षांपासून सातत्याने दहीहंडी उत्सवाची परंपरा जपणाऱ्या मित्रमंडळाच्या आयोजनाला यंदा मोठा प्रतिसाद लाभला. गांगोमाऊली गोविंदा पथक, फोंडाघाट यांनी दमदार कामगिरी करत मानाची हंडी फोडली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहीहंडी उत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाने यंदाही भव्य आयोजनातून आपली संघटनात्मक ताकद दाखवून दिली. मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाखाली झालेल्या या उत्सवात रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध गोविंदा पथकांनी सहभाग घेतला.
दहीहंडीचा थरार, गोविंदांचा उत्साह आणि हजारो उपस्थितांचा जल्लोष यामुळे संपूर्ण परिसर भगवामय आणि उत्सवी वातावरणाने भारावून गेला. त्यातच ‘कोल्हापूरचा धमाका ऑर्केस्ट्रा’ च्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला विशेष रंगत आली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार प्रमोद जठार यांनी दहीहंडीच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि भगवान श्रीकृष्णांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. “दहीहंडी हा आपल्या सर्व बालगोपालांचा उत्सव आहे. गेल्या पाच हजार वर्षांपासून चालत आलेली आपली संस्कृती आणि परंपरा आपण जपली पाहिजे. भगवान श्रीकृष्णांचा विचार, त्यांचे कार्य आणि त्यांनी दिलेला संदेश पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे ही आपली जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन आमदार जठार यांनी केले.
उत्सवाला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, सभापती हर्षदा वाळके, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद रावराणे, मनोज रावराणे, जिल्हा सरचिटणीस अमित साटम, कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर, पंचायत समिती सदस्य बबलू सावंत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांचा मित्रमंडळाचे अध्यक्ष प्रसाद जाधव यांच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.
उत्सवातून संघटन, संस्कृतीतून जनसंपर्क आणि नेतृत्वातून विश्वास—याच त्रिसूत्रीचा प्रत्यय आमदार प्रमोद जठार मित्रमंडळाच्या दहीहंडी उत्सवातून पुन्हा एकदा आला.