महाराष्ट्रातील ‘बीच टुरिझम मार्केटिंगचा अभ्यास
तळेरे दि.२४ जुलै
तळेरे येथील मुंबई विद्यापीठाच्या विजयालक्ष्मी विश्वनाथ दळवी आदर्श महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक हेमंत सुभाष महाडिक यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून व्यवस्थापनशास्त्र विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली.
महाडिक यांनी वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत व्यवस्थापनशास्त्र विषयातून ‘Marketing of Beach Tourism in Maharashtra State’ (महाराष्ट्र राज्यातील समुद्रकिनारी पर्यटनाचे विपणन) या विषयावर संशोधन केले. त्यांच्या संशोधन प्रबंधाला विद्यापीठाने मान्यता दिली असून, डॉ. राजेश एस. शिंदे यांनी त्यांना संशोधनासाठी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राला विशेषतः कोकणाला लाभलेल्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील समुद्रकिनारी पर्यटनाचे विपणन, त्यातील संधी आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक बाबींचा महाडिक यांनी आपल्या संशोधनातून अभ्यास केला आहे.
महाडिक यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल महाविद्यालयाचे मार्गनिर्देशक विनायक दळवी, समन्वयक श्रीपाद वेलिंग, महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी, तळेरे ग्रामस्थ तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.